Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

दिलीप रेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

Advertisements

रत्नागिरी : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी येथील आशादीप संस्थेचे अध्यक्ष दिलीप रेडकर यांची निवड झाली आहे.

श्री. रेडकर यांच्याबरोबरच सुरेंद्र घुडे आणि देवेंद्र पाटील यांचीही निवड झाल्याचे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केला आहे.

श्री. रेडकर यांना २०२२-२३ या वर्षाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय २०१९-२० साठी रत्नागिरीतील घुडे वठार येथील सुरेंद्र घुडे, तर २०२०-२१ साठी देवेंद्र पाटील यांची निवड झाली आहे. लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील भारतीय कष्टकरी रयत संस्था (भाकर) या संस्थेची २०२१-२२ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच शाहू फुले आंबेडकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रतिव्यक्ती १५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र, तर संस्थेला २५ हजार रुपये असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. शाहू फुले आंबेडकर पारितोषिक साडेसात लाख रुपयांचे आहे.

मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए, जमशेद भाभा नाट्यगृह, नरिमन पॉइंट) येथे येत्या १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

आशादीप संस्थेविषयी …

रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य करत आहे. मतिमंद मुलांना समाजात योग्य स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. अशा स्थितीत या मुलांचे संगोपन करायचे कोणी, हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडककर यांचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने ते हवालदिल झाले होते. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्याच समदु:खी पालकांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.

संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात.

संस्था लोकांच्या देणग्यांच्या आधारावरच कार्य करत आहे. त्यामुळे संस्थेला मदतीच्या हातांची गरज आहे. विविध प्रकारच्या मदतीची संस्थेला गरज असून मदत देण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन श्री. रेडकर (84593 48953) यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version