रद्दीदान करून मतिमंदांना सहकार्य करण्याचे आशादीपचे आवाहन

रत्नागिरी : मतिमंद मुलांना कार्यप्रवण ठेवण्याकरिता रद्दीचे दान करून सहकार्य करण्याचे आवाहन आशादीप या येथील संस्थेने केले आहे.

आशादीप ही संस्था कोकण विभागात मतिमंदाना स्वयंरोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही संस्था विनानुदानित तत्त्वावर चालते. संस्थेतील मतिमंद मुले सतत पेपर द्या, आम्हांला पिशव्या बनवायच्या आहेत, असा सारखा धोशा लावत असतात. पिशव्या बनवण्यात त्यांचे मन रमते. पेपराला घडी घालणे, चिकटविणे, वाळत घालणे, शिक्का मारणे, बांधणे अशा प्रकारे त्यांचे कार्य चालू असते. जे वाचक पेपर वाचतात, त्यांनी संस्थेतील मतिमंद मुलांना रोजगार मिळावा, यासाठी दानशूर वाचकांनी आपल्याकडील वर्तमानपत्राची रद्दी देऊन सहकार्य करावे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप रेडकर यांनी केले आहे.

याशिवाय दानशूर व्यक्तींनाही संस्थेने आसामिसां (आपण सारे मिळून सांभाळूया) योजनेत सहभागी होऊन संस्थेला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेनुसार दरमहा किमान १०० रुपये किंवा वर्षभराचे एक हजार २०० रुपये भरून संस्थेला मदत करावी. संस्थेला कळविले, तर संस्थेचा प्रतिनिधी हा निधी स्वतः येऊन पावती देऊन घेऊन जाईल. शक्य असल्यास ऑनलाइनही आशादीप संस्थेच्या बँकेत पैसे भरता येतील. पैसे भरल्यानंतर फोन करून कळवावे, असे सूचित करण्यात आले आहे. संस्थेला देणगी दिल्यास ८०जी अंतर्गत करसवलतही मिळू शकेल. अधिक माहितीसाठी दिलीप रा. रेडकर यांच्याशी ९४२२६३१४१७ किंवा ८४५९३४८९५३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संस्थेच्या आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ, इ-६७ एम.आय.डी.सी.ऑकार काजू फॅक्टरीसमोर, रत्नागिरी- ४१५६३९ येथे भेट द्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply