सप्तखंजिरीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या! आशादीप संस्थेला होईल मदत!

रत्नागिरी : येथील मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आशादीप संस्थेच्या मदतीसाठी सप्तखंजिरी वादनातून सामाजिक प्रबोधन करणारे, सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २९ एप्रिल) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रात्री ९ वाजता होणार आहे. ही माहिती संस्थेतर्फे दिलीप रेडकर, विलास कोळपे, विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणतेही शासकीय अनुदान न मिळताही सामाजिक जाणिवेतून मतिमंद मुलांच्या पालकांनी रत्नागिरीत आशादीप या नावाने निवासी कार्यशाळा सुरू ठेवली आहे. कार्यशाळेत या मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य संस्थेचे दिलीप रेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चालविले आहे. सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांच्या सहकार्यावरच या संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेच्या वसतिगृहाच्या मदतीकरिता सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम रत्नागिरीत २९ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

सत्यपाल महाराज

सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर म्हणजेच सत्यपाल महाराज राष्ट्रीय प्रबोधनकार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सिरसोली हे त्यांचे गाव. घरी अठराविश्व दारिद्रय असताना वडील विश्वनाथ आणि आई सुशीला यांनी विचारांची मोठी श्रीमंती त्यांना दिली. खंजिरी घेण्याची ऐपत नसलेल्या सुशीलाबाईने फुटलेल्या मडक्यावर कागद चिकटवून छोट्या सत्यपालला खंजिरी बनवून दिली. पुढे याच सत्यपालने विचार, संस्कारांच्या विचारांचा ‘गजर’ आणि ‘जागर’ आपल्या सात खंजिऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात केला. त्यांनी आतापर्यंत सुमारे २० हजार कार्यक्रम केले आहेत. कीर्तनात त्यांचा देहदान, नेत्रदान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान संवर्धन, धर्मनिरपेक्षता अशा विषयांवर भर असतो. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार त्यांना काही वर्षांपूर्वी रत्नागिरीत प्रदान करण्यात आला होता.

सत्यपाल महाराजांच्या प्रबाधेनाचा कार्यक्रम आशादीप संस्थेच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेला आर्थिक मदतीचा हात देतानाच त्यांच्या कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन व्हावे, या हेतूने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा लाभ घेऊन आशादीप संस्थेच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन दिलीप रेडकर, विलास कोळपे, विजय पवार, नितीन मुझुमदार, चंद्रमोहन देसाई, प्रकाश सावंत आदींनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply