Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचा पर्यटनविषयक विशेष अभ्यासक्रम

Advertisements

रत्नागिरी : महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी पर्यटनविषयक विशेष अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

कोकणातील निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि खाद्यपरंपरा यामुळे गेल्या काही वर्षांत कोकण हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर कोकणातील पर्यटन उद्योग झपाट्याने विकसित होत असतानाच या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांसाठी या क्षेत्रात भरपूर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत आहेत.

स्थानिक महिलांमध्ये असलेली आतिथ्याची परंपरा, स्वयंपाकातील कौशल्य, भाषेची जाण आणि सृजनशीलता ही पर्यटन क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरते. योग्य प्रशिक्षण दिल्यास या स्त्रिया केवळ आत्मनिर्भरच बनणार नाहीत, तर कोकणातील पर्यटनालादेखील स्थानिक चेहरा मिळेल. हीच गरज ओळखून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत Travel, Tourism & Hospitality या क्षेत्रातील १ वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे हा कोर्स फक्त १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी असून, त्यांना या क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळवून देण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे.

हा अभ्यासक्रम जुलै २०२५ पासून सुरू करण्यात येणार असून अर्धवेळ स्वरूपाचा असेल. एखादे पदवी शिक्षण घेतानासुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होम स्टे, पर्यटन संस्था, मार्गदर्शक, फूड स्टॉल्स आणि पर्यटक सेवा केंद्रे सुरू होत आहेत. या सर्व ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना नोकरीच्या संधी सहज मिळू शकतात. शिवाय, काही महिला आपले पर्यटक गृह (होम स्टे), स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा मार्गदर्शक सेवा सुरू करून स्वतःचा व्यवसायही करू शकतात. अनुभवसंपन्न तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, इंटर्नशिपचा त्यात समावेश आहे.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मान्यताप्राप्त सर्टिफिकेट दिले जाणार असून नोकरी व स्वरोजगारासाठी सहाय्य दिले जाणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी संस्था परिसरात विद्यार्थिनी वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध आहे.

या उपक्रमामुळे रत्नागिरी आणि परिसरातील महिलांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संस्थेच्या वतीने कोकणातील विविध पर्यटन संस्था, हॉटेल्स, होम स्टे, बचत गट व ग्रामपंचायतींशी संपर्क साधून इच्छुक विद्यार्थिनींना या प्रशिक्षणाची माहिती दिली जात आहे.

यासंदर्भात अधिक माहितीकरिता इच्छुकांनी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी (BKVTI), २०१-२०६, एस.बी. नलावडे कमर्शियल कॉम्प्लेस, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता ७४९९८२१३६९ / ९४०३२१४११९ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा bayakarvecls@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क करावा.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version