पर्यटन क्षेत्रात महिलांना नवी दिशा देणारा परिसंवाद उत्साहात

रत्नागिरी : कोकणातील महिलांसाठी पर्यटन क्षेत्रातील करिअरच्या संधींचा वेध घेणारा मोफत शैक्षणिक परिसंवाद महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे रत्नागिरीत मोठ्या उत्साहात पार पडला.

पर्यटन क्षेत्रात महिलांना सुवर्णसंधी – पर्यटनातील करिअर : दिशा आणि संधी या विषयावर आधारित या परिसंवादात कोकणातील पर्यटन क्षेत्राचे बहुआयामी पैलू उलगडून दाखविण्यात आले. कोकणातील पर्यटनाची ओळख या विषयावर प्राचीन कोकणचे संचालक वैभव सरदेसाई यांनी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकत विविध गोष्टीरूप उदाहरणे देत कोकणातील पर्यटनाची पार्श्वभूमी उलगडली.

पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय व रोजगार संधी या विषयावर लॅटरल कन्सेप्टचे पार्टनर मकरंद केसरकर यांनी मार्गदर्शन करताना महिला उद्योजकतेच्या संधी, स्टार्टअप कल्पना व फील्ड अनुभव सांगितले.

पर्यटन शिक्षणातील संधी या विषयावर परशुराम शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या प्रा. डॉ. मीनल ओक यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना या क्षेत्रात स्थिर व यशस्वी करिअर घडविण्याचे मार्ग मांडले. दोन्ही व्याख्यात्यांनी पर्यटन व्यवसायातील रोजगार संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.

यानंतर बाया कर्वे संस्थेच्या टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कोर्सबद्दल व इतर कोर्सबद्दल सविस्तर पीपीटी प्रेझेंटेशन टुरिझम कोर्स समन्वयक प्रा. सोनिया मापुस्कर यांनी केले.

प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी प्रास्ताविक करून संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी प्रकल्प प्रमुख मंदार सावंत देसाई, स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्वरूपा सरदेसाई, कर्मचारी आणि हॉटेल इंडस्ट्रीमधील मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन कु. सिद्धी करंदीकर यांनी, तर आभार प्रदर्शन अॅकॅडमिक को-ऑर्डीनेटर साधना ठाकूर यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अभ्यासक्रमाविषयी :

कोकणातील निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे आणि खाद्यपरंपरा यामुळे गेल्या काही वर्षांत कोकण हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर कोकणातील पर्यटन उद्योग झपाट्याने विकसित होत असतानाच या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांसाठी या क्षेत्रात भरपूर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिक महिलांमध्ये असलेली आतिथ्याची परंपरा, स्वयंपाकातील कौशल्य, भाषेची जाण आणि सृजनशीलता ही पर्यटन क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त ठरते. योग्य प्रशिक्षण दिल्यास या स्त्रिया केवळ आत्मनिर्भरच बनणार नाहीत, तर कोकणातील पर्यटनालादेखील स्थानिक चेहरा मिळेल. हीच गरज ओळखून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत Travel, Tourism & Hospitality या क्षेत्रातील १ वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे हा कोर्स फक्त १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी असून, त्यांना या क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळवून देण्याचा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे. हा अभ्यासक्रम अर्धवेळ स्वरूपाचा असेल. एखादे पदवी शिक्षण घेतानासुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होम स्टे, पर्यटन संस्था, मार्गदर्शक, फूड स्टॉल्स आणि पर्यटक सेवा केंद्रे सुरू होत आहेत. या सर्व ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना नोकरीच्या संधी सहज मिळू शकतात. शिवाय, काही महिला आपले पर्यटक गृह (होम स्टे), स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा मार्गदर्शक सेवा सुरू करून स्वतःचा व्यवसायही करू शकतात. अनुभवसंपन्न तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, इंटर्नशिपचा त्यात समावेश आहे.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मान्यताप्राप्त सर्टिफिकेट दिले जाणार असून नोकरी व स्वरोजगारासाठी सहाय्य दिले जाणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी संस्था परिसरात विद्यार्थिनी वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरी आणि परिसरातील महिलांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

यासंदर्भात अधिक माहितीकरिता इच्छुकांनी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरी (BKVTI), २०१-२०६, एस.बी. नलावडे कमर्शियल कॉम्प्लेस, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता ७४९९८२१३६९ / ९४०३२१४११९ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा bayakarvecls@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क करावा.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply