राज्यातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर; नीतेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चितच सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारूपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा; पण स्वतःची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे,’ असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी केले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन आज (२२ जुलै २०२५) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नीतेश राणे म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री हे विकासपुरुष आहेत. विकास आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळं समीकरण आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पुलाचे उद्घाटन होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. धबधब्यावरील उर्वरित सोयीसुविधा या नापणे, शेर्पे व नाधवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, हॉटेल, दिशादर्शक फलक या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. सद्यस्थितीत आज सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनेच हा पूल उभारण्यात आला आहे.’ (उर्वरित बातमी आणि फोटो जाहिरातीच्या खाली)

उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नापणे गावाचे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे गावाच्या सरपंच लीना पांचाळ, शेर्पे गावाच्या सरपंच सौ. पांचाळ, प्राची तावडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, बाळा जठार, कार्यकारी अभियंता श्रीमती विना पुजारी, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, माजी कार्यकारी अभियंता सर्वगोड, कनिष्ठ अभियंता शुभम दुडीये, ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर, गणेश हळदिवे, अ‍ॅड. उमेश सावंत व पदाधिकारी, ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर नीतेश राणे यांनी पुलावरून फेरफटका मारत पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून हा पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी सिंधुरत्नचे अध्यक्ष, माजी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले. काचेच्या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर व गणेश हळदिवे यांचा राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, भाजपा वैभववाडी व नापणे ग्रामपंचायत यांच्या वतीने नीतेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply