Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पर्यटनात करिअर : इच्छुक महिला-मुलींसाठी रत्नागिरीत प्रथमच मोफत सेमिनार

Advertisements

रत्नागिरी : महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कोकणातील पर्यटन क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे ‘पर्यटनातील करिअर – दिशा आणि संधी’ या विषयावर मोफत शैक्षणिक मार्गदर्शन सत्र (सेमिनार) आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी, २१ जुलै २०२५ रोजी हा सेमिनार रत्नागिरीत होणार आहे. (स्थळ, वेळ, पूर्वनोंदणीविषयी अधिक माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे.)

आज कोकणात पर्यटनासाठी व व्यवसायासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात महिलांनाही अनेक संधी मिळणार आहेत. एअरपोर्ट, हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या, रिसॉर्ट्स या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टूर गाइड, टूर को-ऑर्डिनेटर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा भूमिका निभावून कोकणातील महिलांना स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनात सहभाग घेण्याची संधी आहे. स्वतःचे होम स्टे आणि आणखीही अनेकविध संधी उपलब्ध आहेत. पर्यटनातून करिअर घडवता येईल का, ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करता येईल का, पदवी शिक्षण घेताना पर्यटन विषयातील व्यवसायिक शिक्षण घेता येईल का, असे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. या प्रश्नांची उत्तरे देणारा असा हा संपूर्ण कोकणातील महिलांना एक नवी दिशा देणारा हा सेमिनार असेल. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, आवश्यक कौशल्ये, कोकणातील पर्यटन उद्योगाचा विस्तार आणि पुढील काळात पर्यटनात उदयास येणाऱ्या करिअरच्या दिशा याबाबत पर्यटन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ व्यक्ती या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रश्नोत्तर सत्रही होणार असून, सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. या सेमिनारसाठी प्रवेश विनामूल्य आहे; मात्र पूर्वनोंदणी आवश्यक आहे. (वेळ आणि संपर्काची माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे.)

या सेमिनारनंतर, कोणत्याही शाखेतून बारावी झालेल्या महिलांसाठी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून एक वर्षाचा पार्ट टाइम डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच करिअर तयार घडवण्याची संधी याच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहे.

‘पर्यटन क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं आहे,’ असं वाटत असेल, तर ही संधी न गमावता इच्छुक महिला, मुली आणि पालकांनी या सेमिनारला उपस्थित राहण्याचे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा रत्नागिरी प्रकल्प, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या आणि ‘प्राचीन कोकण’च्या संचालिका सौ. स्वरूपा सरदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.

सेमिनार कधी होणार?
दिवस :
सोमवार, २१ जुलै २०२५
वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ५
स्थळ : हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, व्यंकटेश हॉटेल, मारुती मंदिर, रत्नागिरी
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : 7499821369

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version