रत्नागिरी : लोकसहभागातून नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केल्यासच पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम झाला असून महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलसंपदा विभागातर्फे आयोजित जलसेवा संकल्प अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधी जयंती ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले.
श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीला मोठी गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दिवसात सुमारे ३ हजार ५०० वनराई बंधारे उभारण्याचा नवा विक्रम रत्नागिरी जिल्ह्याने नोंदविला आहे. येत्या एका महिन्यात जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीत मोठी वाढ होईल आणि विहिरींच्या पाणीसाठ्यात सुधारणा होऊन ऐन उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता राहील.
जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागामार्फत ग्रामपंचायती, स्थानिक नागरिक आणि महिला बचत गटांच्या पुढाकाराने जलसंधारणाचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील सावित्री महिला बचत गटाने केलेल्या पाणी नियोजनाची दखल थेट देशपातळीवर घेण्यात आली आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी नियमांनुसार इमारतींमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) भारणीवर भर दिला जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी इतर कामांसाठी वापरल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होईल, असे सांगत पालकमंत्री म्हणाले, पाणी ही मर्यादित नैसर्गिक संपत्ती असून तिचे संवर्धन करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जलसंधारणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला २ ते १७ ऑक्टोबर दरम्यान अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, कार्यकारी अभियंता विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी केले.

