सिंधुदुर्गनगरी : घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग संस्थेने येत्या १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन कसाल येथे आयोजित केले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासीयांचा दिवसभराचा साहित्यिक जागर होणार आहे. कसाल हायस्कूल येथे रविवार, १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ५० साहित्यिक, कवी यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर भूषविणार असून रंगकर्मी, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर संमेलनाचे उद्घाटन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित राहतील.
संमेलनात उद्घाटनसत्र, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, काव्यरंग, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि खुले कविसंमेलन अशी सात सत्रे असतील. दिवसभराच्या या संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी केले आहे.
संमेलनादिवशी सकाळी नऊ वाजता अल्पोपाहार आणि नोंदणी होईल. सकाळी १० वाजता संमेलनाचे ग्रंथपूजनाने औपचारिक उद्घाटन होईल. स्वागताध्यक्ष कसाल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहणे प्रा. प्रवीण बांदेकर आणि उद्घाटक श्रीनिवास नार्वेकर (रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक) यांची भाषणे होतील. अध्यक्षीय भाषण डॉ. महेश केळुसकर करतील. दुसऱ्या सत्रात सकाळी ११.३ वाजता मालवणी मुलखातील लोकसाहित्य या विषयावरील परिसंवाद होईल. त्याचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. गोविंद काजरेकर भूषविणार असून उषा परब, अजय कांडर, जी. ए. सावंत, सदाशिव गावकर सहभागी होतील. दुपारी १२.३० वाजता तिसऱ्या सत्रात कथाकथन होणार असून वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्रात वैशाली पंडित, भाऊसाहेब गोसावी होतील. चौथ्या सत्रात २.१५ वाजता दशावतारातील भीष्माचार्य यशवंत (काका) तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत होईल. प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि पत्रकार रजनीश राणे मुलाखत घेतील. पाचव्या दुपारी साडेतीनला सुरू होणाऱ्या सत्रात ‘काव्यरंग’ : मालवणी कवितांचा नाट्याविष्कार हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे निवेदनः डॉ. सई लळीत करतील. अभय खडपकर, लास्टो पावसू, नीलेश पवार, सहकलाकार सिद्धी वरवडेकर त्यामध्ये सहभागी होतील. सायंकाळी ३.४५ वाजता सुरू होणाऱ्या सहाव्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली रुजारिओ पिटो, डॉ. सई लळीत, विठ्ठल कदम, सरिता पवार, नीलेश गावकर, कल्पना मलये सहभागी होतील सातवे खुल्या कविसंमेलनाचे सत्र सायंकाळी ५.०० वाजता सुरू होईल.
मुंबई-गोवा महामार्गावर कसाल रेल्वे पुलाजवळ कसाल हायस्कूल असून संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी ९४२२४१३८०० किंवा ८८३०५३१८६७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


