Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

भारतीय ज्ञानपरंपरेच्या अध्ययनाची प्रवेशप्रक्रिया सुरू

Advertisements

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या सीडीओई (दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र) केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय ज्ञानपरंपरेचा वैभवशाली वारसा आणि आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन यांचा संगम साधणारे विविध पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.

संस्कृत भाषा, योगशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांविषयी वाढती आवड लक्षात घेता एम.ए. संस्कृत व एम.ए. योगशास्त्र हे दोन वर्षांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच बी.ए. संस्कृत आणि बी.ए. योगशास्त्र हे तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. बारावी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे.

याशिवाय संस्कृत आगम, कर्मकांड, ज्योतिष, वास्तुशास्त्र, वैदिक गणित, भारतीय तत्त्वज्ञान, कीर्तनशास्त्र, संस्कृत पत्रकारिता अशा विविध विषयांतील एक वर्षाचे डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरणार आहेत. सहा महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे – स्पोकन संस्कृत, संस्कृत लेखन, भगवद्गीता, अद्वैत वेदांत इत्यादी.

अल्प कालावधीत कौशल्यविकासाची संधी हे अभ्यासक्रम देतात. तसेच भागवतपुराण, रामायण, महाभारत, सांख्य व योग दर्शन, वैदिक सूक्त, भारतीय पंचांग प्रणाली आदी विषयांवरील परिचयात्मक प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची रुची उत्पादन करणारे ठरणार आहेत.

हे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या सीडीओई (दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र) मार्फत उपलब्ध असल्यामुळे नोकरी करणारे, गृहिणी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही आपल्या वेळेनुसार शिक्षण पूर्ण करू शकतात. माफक शुल्क, सुलभ अभ्यासपद्धती आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन ही या प्रवेश प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वरूप काणे (७२१९०५४०९७) यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version