Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण

Advertisements

बंगळुरू : कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण आज, 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथून झाले.

कोकण रेल्वेच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहिला आहे. ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ अभियानाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मानदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वे टीमचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी या तीन स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन कोकण रेल्वेने केले होते. या तिन्ही स्थानकांवर उभ्या असलेल्या विजेचे इंजिन असलेल्या गाड्या पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रवाना झाल्या. (रत्नागिरी स्टेशनवरील व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

कोकण रेल्वेची स्थापना १९९० साली रोहा ते ठोकूरदरम्यान रेल्वे मार्ग बांधण्यासाठी कंपनी म्हणून करण्यात आली. या संपूर्ण मार्गावर २६ जानेवारी १९९८ रोजी पहिली गाडी रवाना झाली. त्यानंतर १ मे १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वेचे राष्ट्रार्पण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरणाचे उद्धाटन केल्यानंतर कोकण रेल्वेने आणखी एक टप्पा गाठला आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण ७४० किलोमीटर्स लांबीच्या विद्युतीकरणाचे काम ५ टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. ठोकूर ते बिजूर, बिजूर ते कारवार, कारवार ते थिवी, थिवी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते रोहा असे ते पाच टप्पे होते.

कोकण रेल्वेच्या ७४० किलोमीटर्सपैकी सर्वाधिक ३८२ किलोमीटर्सचा मार्ग महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात आहे. गोव्यातून १०६ किलोमीटर्स लांबीचा, तर कर्नाटकातून २५२ किलोमीटर्स लांबीचा कोकण रेल्वेमार्ग जातो.

या रेल्वेमार्गावर एकूण ९७० किलोमीटर्स लांबीच्या ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. त्यापैकी ५१३ किलोमीटर्स अंतर महाराष्ट्रातील, १६३ किलोमीटर्स अंतर गोव्यातील, तर २९४ किलोमीटर्स अंतर कर्नाटकातील आहे.

या विद्युतीकरणासाठी १२८७ कोटी रुपये खर्च आला. मार्च २०२२ मध्ये हे विद्युतीकरण पूर्ण झाले.

कोकण रेल्वेच्या विद्युकरणाचे फायदे

भारतीय रेल्वेमार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने २०१६ साली कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. गेल्या सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होते. या विद्युतीकरणामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासदेखील प्रदूषणमुक्त होणार आहे.

इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त प्रवास

कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे १२ डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून विद्युतीकरणामुळे वाहतुकीच्या प्रतिएकक खर्चात १८ टक्के घट होणार आहे. प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे.

कोकण रेल्वेचा मार्ग आव्हानात्मक आहे. त्यातच करोना महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक झाले होते. पण तेव्हाही काम सुरू होते. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व विद्युतीकरणाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version