रत्नागिरी, सिंधुदुर्गातून आंबे अहमदाबादला पाठवण्यासाठी विशेष रेल्वे पार्सल व्हॅन

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या माध्यमातून आंबा वाहतूक केली जावी, यासाठी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश आले असून, आता कोकण रेल्वेच्या पार्सल व्हॅनमधून रत्नागिरीतून अहमदाबादला हापूस आंबा वाहतूक केली जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये सुमारे दोन हजार पेट्या आंबा यातून जाणार आहे.

याबाबतची माहिती देताना बाळ माने म्हणाले, सध्या करोनाचे सर्वांत मोठे संकट सर्व जगावर असताना कोकणातील आंबा हे नाशिवंत पीकही यातून सुटलेले नाही. कोकणातील हजारो बागायतदार सध्या मोठ्या विवंचनेत असून, बागेत तयार झालेला आंबा कोणत्या पद्धतीने बाजारपेठेत पोहोचवायचा यासह अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. कोकण रेल्वे प्रशासनाचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर त्यांनीही कोकण रेल्वेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची तयारी दर्शवली. यासाठी कोकण रेल्वेची पार्सल व्हॅन सोडण्यात येणार असून, पहिल्या फेरीमध्ये दोन व्हॅन जाणार आहेत.

एका व्हॅनमध्ये साधारण २० किलोची एक पेटी याप्रमाणे १००० पेट्या भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे दोन व्हॅनमधून २००० पेट्या आंबा अहमदाबादला जाणार आहे, असे बाळ माने यांनी सांगितले. यासाठी वाहतूक खर्चसुद्धा अत्यंत नाममात्र असल्याचे ते म्हणाले. एका पेटीमागे रेल्वे केवळ ५५ रुपये इतके नाममात्र भाडे आकारत असून, रत्नागिरी आणि अहमदाबाद येथे मालाच्या चढ-उतारासाठी प्रति पेटी किमान २० रुपये खर्च येणार आहे. ट्रकमधून हा आंबा गेल्यास सध्या प्रति पेटी २५० रुपये इतका खर्च शेतकऱ्याला येत आहे. त्यामुळे रेल्वेने पाठविल्यास शेतकऱ्यांची प्रति पेटी १५० रुपये बचत होणार आहे.

ही रेल्वे पार्सल व्हॅन सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठीही उपलब्ध करून देता येऊ शकणार असून, वेंगुर्ल्यातील बागायतदार, उत्पादकांसाठी कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकांत, तर देवगडच्या बागायतदारांसाठी नांदगाव स्थानकाजवळ ही व्हॅन थांबू शकेल. तेथून वाहतूक करायची झाल्यास रेल्वे शुल्कात किरकोळ वाढ अपेक्षित आहे. रत्नागिरीतून अवघ्या १५ तासांत आंबा अहमदाबाद येथे पोहोचणार आहे. या व्हॅनला योग्य व्हेंटिलेशन असल्याने आंबा १५ तासांच्या प्रवासात टिकून राहणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे माने यांनी सांगितले.

सध्या दोन पार्सल व्हॅन जाणार असून, मागणी वाढल्यास एकावेळी आठ रेल्वे पार्सल व्हॅन जोडता येणार आहेत. त्यामुळे एका वेळी रेल्वेतून आठ हजार पेट्या जाऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपर्क : ९३२२५ २२३३३
………
कोकण रेल्वेने दिलेली माहिती…
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. २० एप्रिलला ही ट्रेन ओखावरून रवाना होईल आणि २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी, एक वाजून ४० मिनिटांनी कणकवली, सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी मडगाव, तर रात्री नऊ वाजून १० मिनिटांनी उडुपी येथे पोहोचणार आहे. २२ एप्रिल रोजी ही ट्रेन तिरुअनंतपुरमवरून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. २३ एप्रिलला ही ट्रेन दुपारी एक वाजून २० मिनिटांनी उडुपी, सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर रात्री ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे. २४ एप्रिलला रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी ही ट्रेन ओखाला पोहोचेल. व्यापारी, उत्पादक, आंबा बागायतदार या ट्रेनमधून आपल्या मालाची ने-आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या या चारही स्थानकांतील पार्सल कार्यालयात याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

(बाळ माने यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply