रत्नागिरी : घरगुती वीजपुरवठा बंद पडला, तर आता कोणाला फोन करायची किंवा ठरावीक ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या नोंदवहीत तक्रार नोंदविण्याची गरज नाही. वीजग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाइलद्वारे मिस्ड कॉल आणि एसएमएस अशी सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी, यासाठी सहज सोपी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार ही सुविधा महावितरणच्या वीजग्राहकांसाठी राज्यभरात सुरू झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. मोबाइलवरून आलेल्या मिस्ड कॉलच्या आधारे संगणक प्रणालीद्वारे ग्राहक क्रमांकाचा शोध घेतला जाईल आणि तक्रार मिळाल्याचा ‘एसएमएस’ संबंधित ग्राहकांना पाठविला जाईल.
मिस्ड कॉल किंवा अन्य ‘एसएमएस’ सेवांसाठी ज्या वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत अद्यापही स्वतःच्या मोबाइल क्रमांकांची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही, अशा ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून MREG हा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची २४ तासांमध्ये महावितरणकडे नोंदणी केली जाईल.
‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून NOPOWER हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही.
मिस्ड कॉल किंवा ‘एसएमएस’ या दोन्ही नव्या सुविधांसह महावितरणची http://www.mahadiscom.in वेबसाइट, मोबाइल अॅप तसेच २४X७ सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्याची सोय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media