रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या २३ एप्रिलपासून हापूस आंब्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत येत्या ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा खुल्या बाजारात विक्री करणे अवघड झाले आहे. परिणामी आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. या बाबीचा विचार करून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा आंबा खरेदी-विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायचे ठरविले आहे. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, कृषी पणन मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या संयुक्त सभेत याबाबतचा निर्णय झाला.
आंबा हे राष्ट्रीय फळ असून कोकणातील आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आजच्या सभेत सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे.
बाजार समितीने सूचित केले आहे की, आंब्याचीच प्रत आणि गुणवत्ता चांगली असावी. फळाचे वजन १८० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. आंबा डागविरहित असावा. या आंब्याची खरेदी-विक्री येत्या २३ एप्रिलपासून दररोज दुपारी तीन वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये होणार आहे.
अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com या ई-मेल वर अथवा किरण महाजन (९४२२६ ३६८३०) किंवा संजय आयरे (७३८७६ ०६५६५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media