ढ मंडळीने आयोजित केली ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा

कुडाळ : येथील ढ मंडळीने आगळीवेगळी ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा आयोजित केली आहे. करोना प्रतिबंधक लॉक डाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे नियम असे – नाट्यगीत कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ८ मिनिटांचे असावे. गायकासोबत वादक असणे बंधनकारक नाही. ही स्पर्धा लॉकडाऊनच्या काळात होत असल्यामुळे शासनाचे नियम पाळणे आवशक आहे. वादक कलाकार घरचेच असतील तरच वापरावेत. तसेच व्हिडीओमध्ये गायक, पखवाज किंवा तबला वादक आणि हार्मोनियम वादक असे फक्त ३ जण असावेत. स्पर्धक हार्मोनियम, तानपुरा, पखवाज किंवा तबला आणि झांजवादक इत्यादींचा समावेश करू शकतात. तसेच पखवाज हार्मोनियम इत्यादी न वापरता स्वतंत्र गायनही करू शकतात.

प्रथम येणाऱ्या पन्नास स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभाग दिला जाईल. निवड झालेल्या प्रथम ५० स्पर्धकांना व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. येत्या २८ एप्रिलपर्यंत स्पर्धकांनी नाट्यसंगीत गायन करून व्हिडीओ बनवून पाठवावा. व्हिडीओमध्ये सुरुवातीला स्पर्धकाचे नाव, पत्ता द्यावा. स्पर्धेत जुने व्हिडीओ ग्राह्य धरले जाणार नसल्याने ज्या दिवशी चित्रीकरण केले जाईल, ती तारीखही चित्रीकरणाच्या प्रारंभी सांगावी. स्पर्धेचा निकाल दोन दिवसांत जाहीर केला जाईल आणि पारितोषिकाची रक्कम ऑनलाइन पाठविली जाईल. प्रथम विजेत्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे एक हजार रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये अशी पारितोषिके दिली जातील. स्पर्धेचे परीक्षण अनुभवी आणि संगीत क्षेत्रातील पारंगत व्यक्ती करतील. परीक्षक आणि आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. नियम आणि अटींमध्ये गरज असल्यास फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांना असेल.

स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधून व्हॉट्स अॅपवर आपली नावनोंदणी करावी नाव, वय, ठिकाण, मोबाइल क्रमांक नमूद करावा. संपर्कासाठी नावे – शुभम सुतार (९४०५३९९८९६), विश्वजित पालव ७३५०२९२२२१)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply