आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वेची आणखी एक पार्सल गाडी

रत्नागिरी : ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर कोकण रेल्वेने सोडलेल्या विशेष पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता आणखी एक गाडी सोडण्यात येणार आहे. मुंबई आणि गुजरातला हापूस आंबा पाठविण्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वच वाहतूक बंद असल्याने आंब्यासारख्या नाशिवंत मालाची वाहतूक करणे कोकणातील बागायतदारांना अडचणीचे ठरले होते. त्यावर कोकण रेल्वेने विशेष पार्सल गाडी सोडली. ती गाडी काल (दि. २१ एप्रिल) रत्नागिरीतून तिरुवअनंतपुरमला रवाना झाली. उद्या (दि. २३ एप्रिल) रात्री ती कोकणात कणकवली आणि रत्नागिरी येथे थांबून गुजरातकडे रवाना होणार आहे. गुजरात आणि मुंबईतून कोकणात येताना औषधे आणि परतताना आंबे घेऊन जाणारी विशेष पार्सल गाडी उपयुक्त ठरली आहे.

या पार्सल गाडीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता त्याच मार्गावर धावणारी आणि त्याच थांब्यांवर थांबणारी आणखी एक गाडी सोडण्यात येणार आहे. 00933 क्रमांकाची गाडी ही २७ एप्रिल रोजी ओखा येथून दुपारी एक वाजून १० मिनिटांनी सुटेल. ती वसई आणि पनवेल येथे थांबून २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत ११ वाजून १० मिनिटांनी, कणकवलीला दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी, मडगावला सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी, तर उडुपी येथे रात्री नऊ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ती तिरुवअनंतपुरमला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी 00934 क्रमांकाची ही गाडी त्याच दिवशी (दि. २९ एप्रिल) रात्री ११ वाजता सुटेल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी एक वाजून २० मिनिटांनी उडुपी, सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर रात्री ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचेल. त्यानंतर ती पनवेल आणि वसईला थांबून गुजरातकडे रवाना होईल आणि एक मे रोजी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी ओखा येथे पोहोचेल. आंब्याची वाहतूक करणाऱ्यांनी रेल्वेच्या पार्सल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply