सूर राहू दे : ‘कोमसाप’च्या मालवण शाखेत व्हॉट्सअॅपवर १३ तास रंगली मैफल

लॉकडाउन सुरू असल्यामुळे बहुतांश जणांना नेहमीची कामे नाहीत, प्रत्यक्ष भेटताही येत नाही. तरीही रसिक मनाचे लोक मात्र त्यातही बसत नाहीत आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग उत्तम रीतीने करतात. याचेच एक उदाहरण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने नुकतेच दाखवून दिले. या शाखेतील सदस्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सूर राहू दे’ ही मैफल तब्बल १३ तास रंगवली. या उपक्रमाविषयी गुरुनाथ ताम्हणकर यांनी लिहिलेला हा लेख… कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.
…………
कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरात आलेल्या महामारीच्या संकटात हतबल न होता एका वेगळ्या उत्साहाने त्यातून मार्ग काढायचा या उद्देशाने ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर सर यांच्या संकल्पनेतून ‘ते चौदा तास पुस्तकांच्या सान्निध्यात’, ‘चित्रशीर्षक’, ‘प्रसंगचित्र भाषा शैली’ असे उपक्रम राबविले गेले. ‘कोमसाप’च्या उत्साही सदस्यांनी ते यशस्वीही केले. यातूनच निर्मिती झाली ती एका आगळ्यावेगळ्या साहित्यिक कार्यक्रमाची- ‘सूर राहू दे.’ आपण जरी लॉकडाउनमुळे एकत्र येऊ शकत नसलो, तरी तंत्रज्ञानाच्या साथीने आपण एकाच कुटुंबातील माणसे आपले सूर नक्कीच जुळवू शकतो. अनेकांना छान आवाज लाभलेले आहेत, त्यांनी आपल्या गाण्याची ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप बनवून ग्रुपवर टाकायची. इतरांनी ती ऐकून त्याला दाद द्यायची, असा तो उपक्रम होता.

शनिवारी, १८ एप्रिल २०२० रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाला; पण याची पूर्वतयारी मात्र अगोदर दोन दिवस सुरू झाली. ‘सर्वांत सुरेल आवाज ना लताचा असतो, ना रफीचा असतो! सर्वांत सुरेल आवाज आपलाच असतो. आपला आतला आवाज! तोच हवा आहे मला शनिवारी! सूर राहू दे!’ अशी साद ठाकूर गुरुजींनी दिल्यावर प्रत्येक जण अगदी पेटून उठला. बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

‘सूर राहू दे’ची सुरुवात अर्थातच ‘कोमसाप’चे सूरदैवत माधवराव गावकर यांच्या ‘तेजोनिधी’ या आदित्यस्तवनाने पहाटेच्या मंगलमय वातावरणात झाली. प्रत्येकाने ही प्रार्थना आपल्या हृदयात ठेवूनच आपल्या घरून साक्षात सूर्यनारायणाला वंदन केले असणार! (सोबत दिलेल्या व्हिडिओत हे गाणे ऐकता येईल.)

पहाटेच्या मंगलमय समयी सनईचे सूर कानी पडणे म्हणजे जणू स्वर्गसुखच! पुणे येथून विजयराव देसाई यांनी बासरीवादन करून रसिकमनावर भुरळ घातली. स्नेहा बाबू घाडीगावकर हिने ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’ ही आसावरी रागातील बंदिश सुंदर सादर केले. बाबू घाडीगांवकर यांनी ‘माझी आई’ या कवितेतून ‘कधी होतील गाठी भेटी’ अशी साद घातली. लक्ष्मण भिवा आचरेकर हे ८० वर्षांचे सदस्य, तरीही उत्साह मात्र दांडगा. नाट्यसंगीत गायन करून त्यांनी आपल्या पिढीतील रसिकांबरोबरच नव्या रसिकांनाही भुरळ घातली. स्वरा अनिरुद्ध आचरेकर हिने गायलेली गझल व आर्या अनिरुद्ध आचरेकर हिने गायलेल्या ‘अधीर मन झाले’ या गीतातून संगीत परंपरेचा वारसा कसा संक्रमित होत जातो हे दाखवून दिले. संगीत साधना कशी करावी हे या भगिनींच्या गायनातून जाणवले.

दौलतराव रामचंद्र राणे यांनी ‘रंग सावळा तेजोमय रूप’ हा अभंग सादर केला. अभंगाचा भावार्थ देहबोलीतून व्यक्त होत होता. त्याला जोड मिळाली ती सुरेल व खड्या आवाजाची. अनुराधा व अनिरुद्ध आचरेकर यांनी ‘शुक्रतारा मंदवारा’ हे द्वंद्वगीत उत्तम सादर केले. उज्ज्वला आनंद महाजन यांनी ‘भक्तिवाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी’ हे गीत सादर करून ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. बाबाजी भोपाळ भिसळे या ७५ वर्षीय ज्येष्ठ सदस्यांनी ‘मागे उभा मंगेश – पुढे उभा मंगेश’ हे शांता शेळके यांचे गीत सादर केले. त्यांना संगीत साथ उत्तम लाभली. ‘कोमसाप’चे सदाबहार गायक संजय वासुदेव परब यांनी ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या भावगीतातून पुन्हा एकदा आपल्या गायकीचा आस्वाद श्रोत्यांना करून दिला.

रवी पाटील यांनी कराओके ट्रॅकवर सुरांचा योग्य मिलाफ करून ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’ हे गीत सादर केले. अशोक धोंडू कांबळी या ७२ वर्षीय ज्येष्ठ सदस्यांनी सुधीर फडके यांनी गायलेला ‘समाधी साधन’ हा अभंग सादर केला. शीला श्रीकांत पेडणेकर यांचा उत्साह व त्यांची आवड ‘पांडुरंगा तुझे गुण गाऊ’ या अभंगातून दिसून आली. कुमार धर्मा कांबळे यांनी ‘धुंदी कळ्यांना’ हे गीत उत्तम सादर केले. (हे सादरीकरण सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल.)

‘काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाची माझ्यावरी ऋण’ अशी बहिणीच्या प्रेमाची महती वर्णन करणारे श्यामची आई चित्रपटातील ‘भरजरी गं पितांबर’ हे गाणे आपल्या सुरेल आवाजात नेत्रा मालवणकर यांनी सादर केले. नीलाक्षी गावकर यांनी संगीत सुवर्णतुला या नाटकातील ‘अंगणी पारिजात फुलला’ हे गीत सादर करून रंगत वाढविली. सुमित विनोद कदम याने संगीतकौशल्याची चुणूक दाखवत सादर केलेले गारवा गीत सर्वांना भावले. स्वरा संजय जाधव या बालसदस्याने ‘ऋतुराज आज वनी आला’ हे गीत छान सादर केले. स्वराशा सुनील कासले यांच्या आवाजातील जादू ‘मोगरा फुलला’ या गीतातून अनुभवता आली. (सोबत दिलेल्या व्हिडिओत हे गाणे ऐकता येईल.)

संगीत साधनेसाठी व सेवेसाठी वाहून घेतलेल्या कीर्तनकार हृदयनाथ लक्ष्मण गावडे यांनी या कार्यक्रमात एक वेगळा प्रयोग करून ‘सूर राहू द्या’ची उंची अधिकच वाढविली. ‘राग एक गाणी अनेक’ ही संकल्पना घेवून ‘यमन’ रागातील अनेक सुमधुर गीतांचे त्यांनी तेवढ्याच ताकदीने सादरीकरण केले. घरातील संगीत साधनेचा छान उपयोग करून घेतला. त्यांना चिरंजीव दूर्वांकने सुंदर तबलावादनाने साथ दिली. आत्माराम नाटेकर यांनी ‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी’ हे गीत उत्तम सादर केले. दूर्वांक हृदयनाथ गावडे या बालसदस्याने ‘पाहू द्या रे मज विठोबाचे रूप’ हा अभंग स्वत: तबलावादन करून सादर केला. खरं तर वादन करून गाणं म्हणणे ही कला या बालवयात जमली, नव्हे तर ती प्रयत्नसाध्यतेने जमविली, त्याबद्दल अभिनंदन.


मनाली मुकुंद फाटक नेहमी पसायदान सादर करतात. त्या दिवशी त्यांनी ‘दिस चार झाले मन’ हे गाणे सादर केले. प्रसिद्ध मालवणी कवयित्री सुनंदा कांबळे यांनी आपलीच ‘स्वप्न’ ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. उज्ज्वला धानजी यांनी स्वत: हार्मोनिअम वाजवून स्वयंवर या नाटकातील ‘स्वकुल तारक’ हे पद सादर केले. स्वत:ची आवड आणि गावकर सरांचे मार्गदर्शन यांचा मिलाफ त्यांच्या गाण्यात दिसला. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने ट्रॅकसह ‘गणपती देवा तुझा किती थाटमाट’ हे बालगीत सादर केले. यशदा रामचंद्र आंगणे हिने ‘आम्ही जिजाऊंच्या मुली’ हे गीत सादर करून गीताचा भावार्थ आपल्या गायनातून दाखवून दिला. ‘तुमची पत्रावळ, आमचो छोटोसो द्रोण’ म्हणत तातू कुबल यांनी अरुण दाते यांचे ‘शतदा प्रेम करावे’ हे गीत सादर केले. त्यांच्यातील कवीबरोबरच एका गायकाचेही दर्शन झाले.

गोविंद गणेश प्रभू यांनी ‘भेट तुझी माझी स्मरते’ हे गीत उत्तम प्रकारे सादर केले. अपूर्वा पवार यांनी ‘एका तळ्यात होती’ हे गीत छान सादर केले. सुजाता टिकले यांनी आपल्या कवितेचे गायन करून उत्तम सादरीकरण केले. वंदना राणे यांनी ‘ये रे घना ये रे घना’ या गीतातून आपले कौशल्य दाखवले. पारस मंदार सांबारी या बालसदस्याने ‘देहाची तिजोरी’ हे गीत सादर केले. वडिलांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्याचा छान प्रयत्न दिसून आला. अनघा अभिजित नेरूरकर यांनी ‘शांत हो श्री गुरुदत्ता’ ही दत्तमहाराज पंचपदी सादर केली.

नेहमी कविता रचून त्यांना चाली लावून आपल्या सुरेल आवाजात सादर करणाऱ्या रश्मी आंगणे यांनी ‘अधीर मन झाले’ हे गीत कराओके ट्रॅकवर आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. तेजल ताम्हणकर यांनी ‘इक दिन बिक जायेगा’ हे गीत सादर करून आपल्यातील गायिकेला वाट मोकळी करून दिली. मंदार श्रीकांत सांबारी यांच्या ‘निज रूप दाखवा हो’ आणि श्रद्धा मंदार सांबारी यांच्या ‘देव माझा विठू सावळा’ या अभंगांतून कुटुंबातील भक्तिमय वातावरण व संगीत साधना यांचे दर्शन घडले. विजय रोहिदास चौकेकर यांनी माता रमाबाई यांच्या जीवनावरील ‘गरिबी जरी त्या संसारात होतीट हे गीत उत्तम सादर केले.

नंतर पुन्हा एकदा विजय देसाई यांनी आपली दुसरी कला सादर केली. माउथ ऑर्गन वादनाने वातावरण प्रसन्न केले. (हे सादरीकरण सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल.) लहान मुलांचे कवी म्हणून ओळखले जाणारे सदानंद मनोहर कांबळी यांनी ‘थांबला देव वाळवंटी’ या गाण्यातून मातृ-पितृभक्ती श्रोत्यांसमोर मांडली. कुणी कल्पना केली नसेल असे गीत निवडून रामचंद्र आंगणे यांनी ‘कावळा पेपेरी वाजवतो’ या गीतातून कार्यक्रमाचा एक समारंभ करून टाकला. याच गीताचा परिपाक म्हणून की काय, सुगंधा गुरव यांनी ‘गंगा सिंधू सरस्वती’ हे मंगलाष्टक गायन करून विवाहसोहळ्याची अनुभूती दिली.

सुरेश श्यामराव ठाकूर यांनी मालवणी भाषेतील आद्यकवी विठ्ठल कृष्ण नेरूरकर यांच्या ‘चेडवाक निरोप’ या कवितेचे गायन केले. वर्षाराणी प्रभू यांनी मंगेश पाडगावकर यांच्या ‘चिऊताई दार उघड’ या गीताचे गायन केले. प्रमोद कोयंडे यांनी सादर केलेल्या ‘मान वेळावुनी धुंद होऊ नको’ या गीताने सारे जण नक्कीच डोलले असतील. श्रावणी गोविंद प्रभू यांनी ‘फिरूनी नवे जन्मेन मी’ हे गीत आपल्या सुरेल आवाजात उत्तम सादर केले. आयुष पवार या बालसदस्याने ‘अवघे गरजे पंढरपूर’ हे गीत सादर केले.

इच्छा असेल तर मार्ग नेहमीच दिसतो. ठाण्यात असलेली झेलम व पुण्यात असलेली प्रसन्ना सुरेश ठाकूर या दोघी भगिनींनी तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करून ‘कधी तू’ हे एकच गीत एकत्रित सादर केले. विचार जुळले की सूरही जुळतात हेच खरे. चंद्रसेन कृष्णा पाताडे यांनी ‘तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची’ हे गीत आपल्या सुरेख आवाजात सादर केलेच. शिवाय सादरीकरणातून सामाजिक संदेशही दिले. विनायक आनंद महाजन यांनी तबलावादन करून आपलाही सहभाग दर्शविला. सायली संजय परब यांनी ‘इतिहासाचे रंगरूप’ हे स्वागतगीत सादर करून सर्व सहभागी गायक व श्रोत्यांचे उत्तम स्वागत केले.

वैजयंती करंदीकर यांनी ‘वर्षाकाठी पर्ज्यन्याचा व्हावा वर्षाव’ या कविता गायनातून निसर्गाकडे मागणे मागितले. त्यांचा सहभाग शक्ती देऊन गेला. ‘कोमसाप’चे प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी ‘तुझ्याकडे मागावे काही’ ही आपली रचना आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तम सादर केली. कल्पना मलये यांनी ‘श्वास घुसमटतोय’मधून नदीची व्यथा मांडली. स्पृहा अमित पवार या बालसदस्याने ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ हे बालगीत छान म्हटले. सरिता पवार यांनी ‘समतेच्या वाटंनं तू यावं’ हे गीत सादर करून संदेश दिला. संध्याकाळच्या मंगलमय वातावरणात उल्का चंद्रकांत घाडी यांनी दिवा पाहुनी लक्ष्मी येते हे गीत सादर केले.

संपूर्ण दिवस ही मैफल उत्तरोत्तर छान रंगत गेली. कार्यक्रमाची सांगता अर्थातच माधवराव गावकर यांच्या भैरवीने झाली. ‘हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे, तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे’ या शब्दांतून कोमसाप व सदस्यांचे नाते अधिकच घट्ट झाले. त्यानंतर सर्व नि:शब्द झाले.

‘झोकून देह जेव्हा हातून कार्य होते, यशदेवता तुम्हाला तेव्हाच साथ देते,’ याचाच या कार्यक्रमातून सर्वांना प्रत्यय आला असेल.

  • गुरुनाथ ताम्हणकर
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply