रत्नागिरी : लॉकडाउनमुळे सगळे काही बंद आहे. त्याला अर्थातच रंगभूमीही अपवाद नाही; मात्र आपल्या विविधरंगी अभिनयाने रंगभूमी गाजवणारे कोकणाचे सुपुत्र वैभव मांगले यांच्या कुंचल्याचे रंग या काळात कॅनव्हासवर कोकणाचे सौंदर्य चितारण्यात गुंतले आहेत. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच देवरुखजवळच्या कासारकोळवण (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या आपल्या गावी आलेल्या वैभव मांगले यांनी आतापर्यंत आपल्या या छंदाला देता न आलेला वेळ या कालावधीत दिला आहे.
देवरुख येथील पत्रकार प्रमोद हर्डीकर यांनी वैभव मांगले यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी लोकांनाही लॉकडाउनचे शिस्तीत पालन करण्याचे आवाहन केले. ‘देशावर आलेल्या करोनाच्या संकटामुळे आमची रंगभूमीही लॉक झाली. मालिकांचेही शूटिंग थांबले. यामुळे मी १९ मार्चलाच गावी आलो. सध्या मी गावातला निसर्ग कॅनव्हासवर रेखाटत असून, रंगोत्सव साजरा करत आहे.’
‘आताच नाटकांचा हंगाम असतो. सध्या माझी अलबत्या गलबत्या व इब्लिस ही नाटके चांगली चालत होती. मात्र सध्याच्या परिस्थिती लॉकडाउन पाळणे आवश्यकच आहे. समाजहितापेक्षा मोठे काय असू शकते? म्हणून मी शासनाचे सर्व नियम पाळून गावातच राहत आहे. नागरिकांनीही घराबाहेर न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सरकारला साह्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘केळीच्या बागा, कलिंगडाचा मळा, नदीचा किनारा या ठिकाणी जाऊन मी तो रम्य निसर्ग कॅनव्हासवर उतरवत आहे. हा रंगोत्सव मला वेगळाच आनंद देत आहे. कॅनव्हास संपला असून, नदीतील वेगवेगळ्या आकाराच्या दगडांना रंगरूप देत आहे. घरातला पाट, जुनी रोवळीही रंगवून झाली आहे. आता मी या रंगांतच रंगून गेलो आहे. बऱ्याच वर्षांनी मी गावातील वातावरण अनुभवत आहे. माझी पत्नीही कंपनीचे काम वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर करत आहे. सासरी इतका काळ कधी न राहिलेल्या तिला या निमित्ताने सासरचे प्रेम अनुभवायला मिळत आहे. दोन मुलेही इकडचा पाहुणचार घेण्यात रमली आहेत,’ असे मांगले यांनी सांगितले.
‘गावातील लोक सुरक्षित अंतर राखून येऊन भेटून जात आहेत. हे आपुलकीचे प्रेमही या काळात मी अनुभवत आहे,’ असे मांगले यांनी सांगितले.
One comment