मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. मडगाव–मुंबई या शुभारंभाच्या वंदे भारत एक्स्प्रेसला गोव्यातील मडगाव रेल्वेस्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून गाडीचा शुभारंभ केला. त्यानंतर विशेष निमंत्रितांना घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. गाडीचे कणकवली आणि रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मडगाव येथे उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा आणि या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले केले असून, देशाला गतिमान करणारी रेल्वेतील ही क्रांती आहे. ही क्रांती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पर्यटकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची लाइफ लाइन असलेली रेल्वे आणखी मजबूत झाली आहे. देशातील दळणवळणाचे साधन आणखी गतिमान झाले आहे.
यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खोटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता गोवा आणि महाराष्ट्राचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्यातील नागरिकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कणकवलीत स्वागत
मडगाव येथून निघालेल्या वंदे भारत गाडीतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण या गाडीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव थांबा असलेल्या कणकवली स्थानकावर आले. कणकवलीत त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी गाडीचे स्वागत केले. त्यानंतर ती रत्नागिरी मार्गे मुंबईकडे रवाना झाली.
रत्नागिरीत ढोलताशांचा गजर
वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी रत्नागिरी स्थानकावर दाखल झाली. गाडीचे रत्नागिरीकरांनी जोरदार स्वागत केले.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या उच्च तंत्रज्ञानयुक्त या गाडीच्या स्वागतासाठी रत्नागिरीकरांनी स्थानकावर गर्दी केली होती. शुभारंभाची गाडी स्थानकावर दाखल होताच ढोलताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत तिचे स्वागत करण्यात आले. पहिल्या गाडीचे लोको पायलट ए. के. कश्यप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गाडी पाहण्यासाठी उपस्थित अनेक नागरिकांनी वंदे भारत एक्स्प्रेससह सेल्फी काढून गाडीच्या स्वागताचे क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपले.
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याच गाडीतून गोव्यातून आले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत रत्नागिरीतून या गाडीतून मुंबईकडे रवाना झाले. गाडीच्या स्वागतासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिन वहाळकर, पतितपावन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मडगाव : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचा समारंभ Live
कोकण रेल्वेमार्गावरील चाचणीच्या वेळचा व्हिडिओ
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

