Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

लांज्याच्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे पावसच्या वृद्धाश्रमात ब्लँकेट, फराळ वाटप

Advertisements

रत्नागिरी : लांज्यातील स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेतर्फे पावस येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमातील महिलांना ब्लॅंकेट आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

‘सकाळ’ रत्नागिरीचे जाहिरात व्यवस्थापक दत्तप्रसन्न कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी ते म्हणाले, स्वराज्य प्रतिष्ठान ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम गेली दहा वर्षे राबवत आहे. यामध्ये कोणताही दिखाऊपणा, दांभिकपणा नाही. कर्ताकरविता परमेश्वर असून हे त्याचे देणे त्यालाच अर्पण करतो आहोत, अशा निःस्वार्थी भावनेतून असे सामाजिक उपक्रम राबवल्यास स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर, जिल्हा परिषद कृषी अधिकारी विजय पोकळे, आदर्श शिक्षक सुहास वाडेकर, सुनील गोसावी, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री पूजा सावंत, ॲड. सुप्रिया सावंत, सौदी अरेबियातील गायक गनी बलबले, स्वरगंध ऑर्केस्ट्राचे संस्थापक यासिन नेवरेकर, राकेश मोरे, नरेश पांचाळ, विनायक नागवेकर, गायिका प्रिया कांबळे, सर्वता चव्हाण, रक्षंदा मोरे, उर्मिला कनगुटकर आदी उपस्थित होते.

यावेळी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ पत्याणे यांचा संस्था स्थापनेचा उद्देश आणि संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा सुहास वाडेकर यांनी घेतला.

कार्यक्रमाची सुरवात स्वरगंध वाद्यवृंदाच्या कलाकारांनी गणेशस्तवन आणि आली दिवाळी.. या गीताने केली. वृद्ध महिलांना श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. स्वरगंधच्या कलाकारांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शोधिशी मानवा, गोमू संगतीने, शुक्रतारा मंद वारा, राजा ललकारी अशी घे अशी उत्तरोत्तर रंगत जाणारी गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि वृद्धाश्रमातील महिलांचा आनंद द्विगुणित केला.

प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमातील व्यवस्थापक, वृद्ध महिलांची देखभाल करणाऱ्या महिलांचा, स्थानिक महिला पोलीस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version