‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण आज जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते झाले.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अठरावे मध्यवर्ती साहित्य संमेलन येत्या २७ ते २९ नोव्हेंबर या काळात कवी केशवसुतांचे जन्मस्थान असलेल्या मालगुंडमध्ये होणार आहे.

कोकणच्या मातीत शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज असते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे, असे भावस्पर्शी उद्गार श्री. सातपुते यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले, संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्ह म्हणजे केवळ कापडाचा तुकडा किंवा चित्राची रेषा नसते; तर ती साहित्य, संस्कृती, विचार आणि रसिकतेची एक उत्तुंग पताका असते. जेव्हा हा ध्वज आकाशात डोलू लागतो, तेव्हा तो केवळ एका सोहळ्याची घोषणा करत नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील संवेदनशीलतेला साद घालत असतो. आजच्या या अनावरण सोहळ्याने येत्या संमेलनाचे मंगल तोरण बांधले गेले आहे.

ते पुढे म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेने कोकणचा सांस्कृतिक आणि भाषिक ठेवा अनेक वर्षे अविरतपणे जपला आहे. कवी केशवसुतांच्या स्मारकाच्या साक्षीने उभारला जाणारा हा साहित्यकुंभ निश्चितच नव्या विचारांची, संवादांची आणि साहित्यप्रेमींची एक नवी लाट निर्माण करेल. आज फडकलेल्या या साहित्यध्वजाच्या छायेत आपण सर्वांनी एकत्र येऊ या आणि आगामी संमेलनाला शब्दांची, विचारांची आणि संस्कृतीची भव्य पालखी बनवू या," असे आवाहन श्री. सातपुते यांनी केले.

केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, साहित्य माणसाला जगण्याचा विचार देते आणि जगणे सुंदर करते. त्यामुळे साहित्य संमेलने ही केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागात तळागाळापर्यंत व नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत. 'कोमसाप'ने गेल्या ३५ वर्षांच्या प्रवासात मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्येही संमेलने घेऊन आपली ओळख वैश्विक स्तरावर निर्माण केली आहे. १९९१ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुतांच्या स्मारकाची उभारणी आणि 'कोमसाप'च्या स्थापनेचा संकल्प याच भूमीतून सोडला होता. तरुणांच्या हातात लेखणी यावी आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत, हाच अशा संमेलनांचा मूळ हेतू आहे.

आगामी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके असल्याने आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात साहित्य आणि विज्ञानाची उत्तम सांगड या संमेलनातून घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मालगुंड येथील केशवसुत स्मारकात दिमाखात पार पडणारे साहित्य संमेलन अखिल भारतीय पातळीवरील संमेलनाच्या दर्जाचे व्हावे असा प्रयत्न असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांतील तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विशेष ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. संमेलनाला उपमुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार असल्याने हे संमेलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले, वर्गखोल्या आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवी पिढी घडवण्यासाठी साहित्य व वाचनाचे संस्कार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे,. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब ठरली असून, त्यानंतर भाषेचा जागर राज्यभरात अधिक वेगाने सुरू आहे. परिवहन विभाग व मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने सुमारे १ लाख ६० हजारांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दैनंदिन वापरासाठी सुलभ मराठी शिकवण्याचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

संमेलनाला मॉरिशसच्या राजदूत शीलाबाय बापू (ज्या मूळच्या सावंतवाडीच्या कन्या आहेत) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला १८व्या मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी आदी उपस्थित होते. कार्यवाह गजानन पाटील यांनी सविस्तर प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply