करोनाबाधितांचे मरण सुसह्य करण्यासाठी पाठविले सरण

रत्नागिरी : वाघ्रट (ता. लांजा) गावचे सुपुत्र, उद्योजक ऋषीनाथ तथा दादा पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आज रत्नागिरी पालिकेच्या स्मशानभूमीसाठी २५ टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची अंत्यसंस्कारावेळी परवड होऊ नये या सामाजिक जाणिवेतून ही लाकडे देण्यात आली.

श्री. पत्याणे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेने स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यामध्ये मरण पावणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यांच्यावर रत्नागिरी पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता जाणवत होती. हे समजताच दादा पत्याणे यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि स्वखर्चातून २५ टन लाकडे देण्याचा संकल्प सोडला आणि आज तो प्रत्यक्षात आणला. करोनाबाधितांचे जगणे सुसह्य करणे तसे हाती नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे हाल तरी कमी करावेत, त्यांचे मरण सुसह्य करावे, या सामाजिक भावनेतून पत्याणे यांनी सरणासाठी लाकडाचा पुरवठा केला आहे.

यावेळी दादा पत्याणे, सुपुत्र नीतिश पत्याणे, बंधू सुनील पत्याणे, प्रमिल पत्याणे, संतोष पत्याणे, पुनसचे सरपंच इलियास बंदरी, विनोद सावंत, सुभाष जाधव, कोट उपसरपंच नंदकुमार आग्रे, रवींद्र पाष्टे, चांदोरचे पोलीस पाटील प्रवीण मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेलार आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply