सॅटर्डे क्लबतर्फे वृद्धाश्रम आणि मतिमंदांच्या संस्थेला पाण्याच्या टाक्या

रत्नागिरी : सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे पावस येथील अनुसूया आनंदी महिला वृद्धाश्रम तसेच रत्नागिरीतील मतिमंदांच्या आशादीप संस्थेला पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.

सॅटर्डे क्लब ही मराठी व्यावसायिकांची संस्था गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत असून रत्नागिरी चाप्टरला पाच वर्षे झाली आहेत. संस्थेचे संस्थापक माधवराव भिडे यांचे ७ जुलै २०१८ रोजी निधन झाले. तो दिवस कृतज्ञता दिवस म्हणून पाळला जातो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ८ जुलै रोजी सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरची स्थापना झाली. कृतज्ञता दिवस आणि रत्नागिरीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने सॅटर्डे क्लबच्या सर्व सदस्यांनी वर्गणी काढून टाक्यांची खरेदी केली. या दोन्ही संस्थांना पाणी साठवण्यासाठी टाक्यांची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी संस्थांना दोन हजार लिटरची प्रत्येकी एक टाकी देण्यात आली.

पावसच्या महिला वृद्धाश्रमात ११ महिला असून त्यांच्यासह विश्वस्त सौ. चेतना खातू यांच्या उपस्थितीत टाक्या देण्यात आल्या. यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रतीक कळंबटे, सचिव प्रकाश भुरवणे, खजिनदार सागर वायंगणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका सौ. अरुणा कदम आणि मदतनीस ज्योती शिंदे, सौ. नैना शेडगे, सौ. सुरेखा नैकर, सौ. दीपा चव्हाण यांना साडीचोळीची भेटही सॅटर्डे क्लबतर्फे देण्यात आली. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरीच्या एमआयडीसीतील आशादीप संस्थेत संचालक दिलीप रेडकर यांच्याकडे पाण्याची टाकी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थेचे चंद्रमोहन देसाई, संजय वैशंपायन तसेच क्लबचे क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापन दिन शनिवारी, ८ जुलै रोजी रत्नागिरीत मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये साजरा होणार आहे. उद्योजक तसेच नवउद्योजकांनी या समारंभाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. त्याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणीकरिता अध्यक्ष प्रतीक कळंबटे (91306 30260) किंवा सचिव प्रकाश भुरवणे (82759 19821) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply