रत्नागिरी : व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात केवळ गुंतवणूक करावी. दैनंदिन व्यवस्थापकीय कामकाजात गुंतून राहू नये. तसे झाले तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकेल, असा कानमंत्र सांगलीतील चिंतामणी मोटर्सचे संचालक उज्ज्वल साठे यांनी उद्योजकांना दिला.
सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापन दिन रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्लबचे एलिट मेंबर या नात्याने ते बोलत होते. श्री. साठे म्हणाले, व्यवसाय यशस्वी न होण्याची किंवा व्यवसायात फारशी प्रगती न होण्याची अनेक कारणे आहेत. व्यावसायिक जर दैनंदिन व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात व्यवस्थापकाप्रमाणे अडकून राहिलास तर ती त्याची एक प्रकारे नोकरी ठरते. तसे न करता त्यांनी सर्व कामे कर्मचाऱ्यांकडून करून घेतली पाहिजेत आणि आपला वेळ व्यवसायाचे धोरण आणि प्रगतीची आखणी करण्यासाठी दिला पाहिजे. आधी आपला ग्राहक नक्की करावा. ग्राहकाला जे अपेक्षित असेल ते देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करावा. त्यादृष्टीने नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी. तरच उद्योग यशस्वी होऊ शकतो. व्यवसायासाठी, कौटुंबिक खर्चासाठी तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून द्यावयाच्या निधीचेही नियोजन करावे. प्रत्येक वस्तू आणि सेवा घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत असल्याने आपल्या स्वतःच्या वेळेचीही किंमत स्वतःच ठरविली पाहिजे, असेही श्री. साठे म्हणाले.
मराठी उद्योजकांनी पुढे यावे, एकमेकांना सहकार्य करावे. त्यातून आपली आणि समाजाची प्रगती साधावी, अशी सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधवराव भिडे यांची संकल्पना होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही श्री. साठे यांनी केले.
शासनाच्या विविध योजनांचा उपयोग उद्योजक आणि व्यावसायिकांनी करून घ्यावा. अनेक प्रकारचे अनुदान तसेच वित्तपुरवठ्यासाठी या योजना उपयुक्त आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी दिली. छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी कोकणातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी व्यावसायिकांनी विविध योजनांचा फायदा घेऊन स्थलांतरित होणाऱ्या तरुणांना रोजगार द्यावा आणि स्थलांतर रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहनही श्री. मुळे यांनी केले.
जागृत मोटर्सच्या संचालिका रेश्मा जोशी यांनी सांगितले की उद्दिष्ट निश्चित केले आणि प्रामाणिकपणे वाटचाल केली, तर व्यावसायिक यश निश्चितपणे मिळू शकते. तशी मानसिकता प्रत्येकाने तयार केली पाहिजे. त्यातून अनेकांना चांगला रोजगारही देता येऊ शकतो.
समारंभात गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे प्रमुख शाळिग्राम खातू यांची मुलाखत पत्रकार प्रमोद कोनकर यांनी घेतली. शून्यातून निर्माण केलेल्या आणि आता सर्वत्र पसरलेल्या खातू मसाले उद्योगाची वाटचाल श्री. खातू यांनी यावेळी उलगडून दाखवली.
पावस येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमाला तसेच रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरातील आशादीप मतिमंदांच्या संस्थेला सॅटर्डे क्लबतर्फे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने कृतज्ञता दिनी पाण्याच्या टाक्यांची भेट देण्यात आली. या दोन्ही संस्थांतर्फे सौ. चक्रदेव आणि दिलीप रेडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उद्योगांच्या आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या क्लबच्या सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
चाप्टरचे अध्यक्ष प्रतीक कळंबटे, सचिव प्रकाश भुरवणे, खजिनदार सागर वायंगणकर, कोकण रिजनचे प्रमुख राम कोळवणकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रत्नागिरीसह चिपळूण आणि कुडाळ येथील अनेक उद्योजक समारंभात सहभागी झाले होते.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

