महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : हिंदू धर्मातील पवित्र पितृपक्ष सुरू झाला असून महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करावे, असे आवाहन पावस (ता. रत्नागिरी) येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमातर्फे करण्यात आले आहे.

आईवडिलांची सेवा ही मोठी पूजा असे मानण्यात येते. आईवडील तसेच अन्य जवळचे नातेवाईक आपले जीवन घडवत असतात. यांचे श्रद्धापूर्वक स्मरण पितृपक्षात केले जाते. श्राद्धाचे विविध मार्ग आपल्या धर्मग्रंथात वर्णिलेले आहेत. मात्र इच्छा असूनही बदलत्या जीवनशैलीत श्राद्ध करणे अनेकांना अवघड ठरत आहे. अशा वेळी अन्नदानाचा पर्याय स्वीकारला जातो. आपल्या संस्कृतीत अन्नदानाला खूप महत्त्व आहे. ते सत्पात्री व्हावे, अशी इच्छा असणाऱ्यांनी पावस (ता. रत्नागिरी) येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमाला मदत करावी. या वृद्धाश्रमात दरवर्षी असे अन्नदान केले जाते.

हा आश्रम कै. मंगला नारायण सोमणी या मुंबईतील निवृत्त मुख्याध्यापिकेने स्वकमाईची सर्व रक्कम खर्च करून २४ डिसेंबर १९९५ रोजी स्थापन केला आहे. अव्याहतपणे हा आश्रम कार्यरत असून सध्या आश्रमात नऊ महिला आहेत. त्यांच्याकडून अत्यल्प शुल्क घेऊन आश्रम चालविला जातो.

यावर्षी पितृपक्ष २१ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो ६ ऑक्टोबरपर्यंत आहे. या काळात वृद्धाश्रमात पितरांच्या स्मरणाच्या तिथीप्रमाणे अन्नदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी संस्थेच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. पैसे ट्रान्स्फर केल्याचा स्क्रीन शॉट, दात्याचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाइल क्रमांक, पितरांचे नाव, स्मरण तिथी आदी तपशील ९९२१६ ५९१५६ या व्हॉट्स ॲपवर कळवावा. पावती पोस्टाने पाठविण्यात येईल. रोख रक्कम तसेच धनादेशही स्वीकारण्यात येईल. ठरावीक दिवशी संबंधित पितरांचे स्मरण आणि अन्नदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव संस्थेच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. पितरांची पुण्यस्मरण तिथी माहिती नसल्यास सर्वपित्री अमावस्येला अन्नदान करता येईल, असे संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. अरुणा कदम यांनी कळविले आहे.

संस्थेचे नाव, पत्ता आणि बॅंक खाते तपशील असा – अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रम, मु. पो. पावस, ता. जि. रत्नागिरी.
बँक ऑफ महाराष्ट्र, पावस शाखा,
खाते क्र. 20176462568.
IFSC MAHB0000461.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply