रत्नागिरी : रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने शनिवारी (दि. २५ सप्टेंबर) होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरीत होत आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात आहे. सुरुवातीला २० हजार चौरस फुटांहून अधिक परिसरात संगणक लॅब, डिजिटल क्लासरूमसह योग कक्ष आदी अनेक सोयींनी सज्ज असे उपकेंद्र असेल. लवकरच उपकेंद्राचे स्वतंत्र भवनही साकार होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, वित्त आणि लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, गुरुकुलचे संचालक प्रा. पराग जोशी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे विशेषत्वाने उपस्थित राहतील. मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे, आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने हेही उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी १२ वाजता मध्यवर्ती एसटी बसस्थानकासमोरील अरिहंत संकुलात होणार आहे.
