Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष

Advertisements

देशातील सर्वाधिक उत्पादन असलेले, सर्वाधिक जमिनीवर उगवणारे आणि सर्वाधिक लोकांचे अन्न असलेले भरड धान्य अधिकाधिक वापरले जावे, या उद्देशाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याविषयीची माहिती
…………..

भरड धान्य म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण पूर्वी उखळ आणि मुसळ वापरून ज्या धान्यावरील साल किंवा कवच भरडून काढले जात असे, त्यानंतर गरजेनुसार जात्यावर दळून पीठ तयार केले जात असे, त्याला भरड धान्य असे म्हणतात. ‘भरड धान्य’ म्हणजे लहान-बीज असलेल्या तृणवर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट, जे जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

साधारणतः भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. या धान्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नसते. भरड धान्य हे ‘श्रीअन्न’ म्हणूनही ओळखले जाते. ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’, तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो आणि ब्राऊनटॉप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना ‘स्यूडो मिलेट्स’ असे म्हणतात.

ज्वारी, बाजरी, नागली या भरड धान्यांमध्ये गहू आणि तांदूळ यापेक्षा कित्येक पटीने अधिक खनिज, कॅल्शियम, प्रथिने असल्याचे राष्ट्रीय पोषण संस्थेच्या आतापर्यंतच्या अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. बालकांच्या कुपोषणाचे मूळ मातांच्या कुपोषणात असल्याचे वैद्यकीय संशोधनांनी सिद्ध केले आहे. अनेक महिलांमध्ये अॅनिमिक स्थिती असते. अर्थात रक्तातील लालपेशींची कमतरता असल्याने त्या अशक्त होतात. देशात शारीरिकदृष्ट्या कमजोर मातांचे प्रमाण जास्त आहे. असे असतानाही ज्वारी, बाजरी, नागलीसारख्या उच्चतम पोषक मूल्यांच्या भरड धान्यांकडे दुर्लक्ष केले जाते. फक्त महिलांचे आणि बालकांचे आरोग्यच नव्हे, तर सध्याच्या ढेपाळलेल्या शेती व्यवस्थेवरही भरड धान्य हे सकस पर्याय आहे. हवामानातील बदल, पाण्याची ओढ, कोरडवाहू शेती, बियाणांचा आणि खतांचा गगनाला भिडणारा खर्च या साऱ्यावर ज्वारी, बाजरी, नागली ही पिके नामी उपाय आहेत.

भरड धान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. यापासून ॲलर्जीचा धोका नाही. या पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर अल्प प्रमाणात होतो. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती ‘पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून ओळखली जातात आणि पचायला हलकी असतात. यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारतो. ही धान्ये पक्ष्यांचे आवडते खाद्य असून जैवविविधता वाढते. तसेच यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ विकल्याने बचत गट स्वयंपूर्ण होऊ शकतात. बाजरीमध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून, ते पेशींमधील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठवण्यास साहाय्य करतात. लोहाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढते. नाचणीमध्ये नैसर्गिक कॅल्शियम सर्वाधिक असल्यामुळे रोजच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य चांगले रहाते. कोकणातील डोंगर, पठारावर पिकवण्यात येणारी नाचणी अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलांप्रमाणेच वयोवृद्धांना नाचणीचे सत्त्व उपयुक्त असते. सकस आहारामध्ये नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. राळ हे पाचक असून त्यात लोह आणि खनिज पदार्थ भरपूर आहेत. वरईमध्ये उच्च लोह धातू आहे. कोडो/ कोद्रा मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट आहे.

नगदी पिकांच्या एकल शेती पद्धतीमुळे रासायनिक खतांचा भडीमार झाल्याने जमिनीचा घसरलेला पोत, पाण्याच्या जोरदार उपशामुळे खाली गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी, लाखो रुपयांच्या पीककर्जाने पिकवलेल्या सोन्याच्या मालाला बाजारातील अनियमिततेमुळे मिळणारा मातीमोल भाव, यावर उतारा ठरणाऱ्या मिश्र शेतीत भरड धान्ये संजीवनी ठरत आहेत. पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ज्वारी, बाजरी, नाचणी हेच पर्याय दिसत आहेत. कोकणातील डोंगरउतारावरचा आदिवासी शेतकरी असो, वा सिंचनाअभावी होरपळणारा मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी असो, भरड धान्य पिके हाच सर्वांपुढचा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे.

भरड धान्ये काही दशकांपूर्वी आपल्याकडील आहाराचा मुख्य भाग होता. परंतु पॉलिश्ड धान्यांमुळे ती रोजच्या आहारातून दिसेनाशी झाली. परंतु अस्सल भरणपोषण करणारी ही भरड धान्ये आजही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे आता या भरड धान्यांना महत्त्व मिळावे आणि जागतिक पातळीवर त्यांचा वापर वाढावा म्हणून भारताने पुढाकार घेतला आहे. आपल्या देशाने इतर काही देशांच्या मदतीने भरडधान्यांना संरक्षण मिळावे, त्यांचे लागवडीचे क्षेत्र वाढवून लोकांच्या आहारात त्यांचा समावेश व्हावा. त्याचे महत्त्व जगाला समजावे यासाठी “आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष” साजरे करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र संघात मांडला. युनायटेड नेशन्स (UN) म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य असलेल्या ७० देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व १९३ सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या प्रयत्नाचे कौतुक करत हा ठराव बहुमताने मंजूर केला. आपल्या देशाच्या या प्रयत्नांमुळेच ३ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरले आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

आता सुरू झालेले वर्ष “आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष” म्हणून यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही कंबर कसली आहे. महाराष्ट्रात ज्वारी आणि नाचणी या प्रमुख भरड धान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशातील भरड धान्य उत्पादनात राज्याचा सिंहाचा वाटा असावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढविण्यात येणार असून, राज्यात पिकणाऱ्या भरड धान्यांपासून उत्पादित खाद्यपदार्थांची महिला बचत गटांच्या माध्यमातून विक्री व्हावी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या पोषण आहारातदेखील भरड धान्यापासून तयार केलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश व्हावा, यासाठी नवनवीन संकल्पना तयार करण्यात येत आहेत. भरड धान्यांपासून खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. या खाद्यपदार्थांचे स्टॉल मंत्रालयाच्या प्रांगणात आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि शासकीय कार्यक्रमात मांडण्यात येणार आहेत.

याच अनुषंगाने राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फेब्रुवारी २०२३ चा लोकराज्यचा अंक हा भरड धान्य विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला आहे. शासनाने भरडधान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालय स्तरावर कृषि, पणन, उमेद सारख्या विभागांच्या बैठका घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाने तयार केलेल्या “आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष” या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात पार पडले. कृषि विभागाने याच विषयावर आधारित एक पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत प्रकाशित केले. यावेळी महाराष्ट्र भरड धान्य आणि त्याची आरोग्यदायी उत्पादने ग्रामीण महिला बचतगट कसे बनवितात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी भरड धान्यांची पौष्टिकता आणि शेतीमधील त्यांचे पारंपरिक महत्त्व लक्षात घेता राज्यातील भरड धान्य उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असे सांगितले. या उपक्रमात विविध विभागांनी सर्वतोपरी सहभाग घ्यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.

कोरडवाहू शेतकऱ्यांपासून आदिवासींच्या कुपोषणापर्यंत, दुष्काळापासून अनारोग्याच्या संकटापर्यंत अनेक प्रश्नांचे उत्तर ठरलेल्या ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या भरड धान्यांचे उत्पादन वाढले तर राज्यातील आणि देशातील अन्नधान्याविषयीच्या, कुपोषणाच्या विविध समस्या समूळ नष्ट होतील. भरड धान्य वापराचे प्रमाण वाढवून आपणही यात सहभागी होऊ या.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version