भरडधान्यांची लागवड थांबलेलीच

नुकतेच सुरू झालेले वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय झाला आहे. देशभरात त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. अर्थातच राज्य शासनही भरड धान्य वर्ष साजरे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. माहिती महासंचालनालयातर्फे भरडधान्यांच्या प्रचारासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. त्याबद्दलचे लेख प्रसिद्ध होतील. वर्ष साजरे होईल, पण त्याचा मूळ उद्देश साध्य होईल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, मका इत्यादी पिके भरडधान्यांच्या श्रेणीत येतात. या धान्याचे वैशिष्ट्य असे की या धान्यांचे पीक कोरड्या भागातही तयार करता येते. इतकेच नव्हे तर तांदळाच्या तुलनेत या पिकांसाठी खर्चही कमी येतो. त्यांचे उत्पादन इतर पिकांच्या तुलनेत तसे कमी वेळेत येते. कोकणापुरता विचार करायचा झाला तर नाचणी आणि वरी ही कोकणाची फार पूर्वीपासूनची भरडधान्ये आहेत. भात हे कोकणाचे महत्त्वाचे पीक आहे. भातशेतीची लागवड पूर्ण झाली की त्यानंतर डोंगरउतारावर नाचणीची लागवड केली जात असे. अर्थातच कोकणवासीयांच्या नियमित आहारातही नाचणीला खूप महत्त्व होते. शेतकरी नाचणीची भाकरी खाऊनच शेतीची कामे करत असत. वरीचे उत्पन्न तुलनेने कमी असले तरी ते घेतले जात असे. वरीची बाजारात विक्री करून मिळणारे उत्पन्न आर्थिकदृष्ट्या हातभार लावत असे. नाचणीचे महत्त्व आता सांगितले जात असले तरी पूरक पीक म्हणून ते घेतले जात असे. पण आता मुळातच भातशेतीच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वीस वर्षांपूर्वीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख हेक्‍टरवर भाताची लागवड केली जात असे. यावर्षी हे प्रमाण ६५ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. दिवसेंदिवस भातशेतीच्या क्षेत्रात घटच होत आहे. भातशेतीची कामे पूर्ण केल्यानंतर नाचणीची लागवड केली जात असे. पण भाताची लागवडच घटल्यामुळे नाचणीच्या लागवडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

भात आणि नाचणीची लागवड कमी होण्याची अनेक कारणे आहेत. जो शेतकरी ही पिके पिकवत असे, त्याला अलीकडच्या काळात मोफत किंवा अत्यल्प किमतीत धान्य उपलब्ध होत असल्यामुळे मेहनत करून पीक घेण्याकडे त्याचा असलेला कल कमी झाला आहे. त्याचबरोबर कष्टाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्नही नगण्यच असते. शेतीच्या म्हणून इतर अनेक समस्या आहेत. कोकणातील भातशेती प्रामुख्याने भरडी प्रकारची आहे. तेथील मुख्य असलेल्या भातपिकाला पाण्याची गरज असते. पण पावसाच्या अनियमितपणामुळे मोठा कालखंड कोरडा गेला तर भाताचे पीक येत नाही. केलेली मेहनत वाया जाते. इतर पिकांप्रमाणे भाताची फेरपेरणी अनेकदा करता येत .नाही फार फार तर ती एकदाच करता येऊ शकते. अशा अनेक कारणांमुळे भात या मुख्य पिकाच्या लागवडीमध्येच घट झाल्यामुळे नाचणीची लागवडही थांबली आहे. या पिकांचे खाद्यपदार्थांमधील महत्त्व पटवून देत असताना या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा वाढावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हायला हवेत. स्थानिक गरजा आणि समस्या लक्षात घेऊन त्यासाठी कोकणाकरिता स्वतंत्र धोरण आखावे लागेल. हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असले तरी एका वर्षात पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात अचानक वाढ होण्याची शक्यता नाही. भविष्यात सतत याच धान्याची असलेली गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या धान्याची लागवड फायदेशीर ठरावी, यासाठी या नव्या आणि फलदायी धोरणांची आवश्यकता आहे. तशी धोरणे वर्षभरात ठरविली गेली, तरी भरडधान्य वर्ष साजरे केल्यासारखे होईल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २० जानेवारी २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply