कोकणात रेल्वे आहे, पण रेल्वेत कोकण आहे का?

कोकण रेल्वे हे मुंबईकर चाकरमान्यांसाठी प्रवासाकरिता हक्काचे आणि स्वस्त साधन उपलब्ध झाले आहे. मात्र या मार्गावरून कोकणात आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना नेहमीच वेटिंगवर राहावे लागते. ही स्थिती बदलणार आहे का?

……………………………………………..

कोकणचे प्रवासी विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे रहिवासी कोकण रेल्वेवर अवलंबून राहून प्रवासाची आखणी करतात. पण त्यांच्या पदरी पडते ती निराशाच. कारण गेली कित्येक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वेची प्रवाशांबद्दलची उदासीनता यामुळे सगळे खासगी वाहनांवरच अवलंबून राहतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर राजकारणी आणि प्रशासनाने गांभीर्याने कोकणी माणसाकडे पाहण्याची वेळ आली आहे. वेळ आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या किमान मागण्या मान्य करायलाच हव्यात. अन्यथा कोकणी माणसाच्या संतापाचा कडेलोट होऊन प्रशासनाला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.

कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागण्या काही जगावेगळ्या आणि अशक्यप्राय नाहीत. किमान त्या समजून घ्यायलाही या प्रशासनाला वेळ नाही, ही संतापाची बाब आहे. कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर मार्गाचे दुपदरीकरण झाले. त्यात नुकत्याच सगळ्या गाड्या सुपरफास्ट झाल्याचा गवगवा करण्यात आला. सर्व गाड्या विजेवर धावतात. वेळेची बचत होते. हे सगळे ठीक आहे. पण याचा नेमका फायदा कोणाला? कोकण रेल्वे हे नुसते नाव झाले, कोकणी माणसाला या गाड्यांचा नेमका किती लाभ होतो, याचा कोणी विचारच करत नाही. दक्षिणेकडील प्रवासी हेच खरे कोकण रेल्वेचे प्रवासी असल्याचा प्रशासनाचा समज आहे. त्यामुळे रायगडच्या पुढे असणारी आणि सावंतवाडीच्या अलीकडे असणारी सर्व रेल्वे स्थानके आणि तेथील चाकरमान्यांवर आपण उपकारच करत आहोत, अशी प्रशासनाची भावना होत चालली आहे. हे चीड आणणारे आहे. फक्त कोकणासाठी आजमितीस केवळ तीन गाड्या आहेत. त्यांचा लाभ घेताना अगदी दाटीवाटीने, उभ्याने कसाबसा प्रवास करणे आणि कधी एकदा आपल्या गावी पोहोचतो या विचारात कोकण रेल्वेबद्दल नाराजी व्यक्त करत प्रवास करणे एवढेच प्रवाशांच्या हाती असते. दक्षिणेकडील प्रवासी सुशेगात आणि कोकणचे प्रवासी दुर्लक्षित अशी विदारक परिस्थिती आहे.

कोकण रेल्वे नक्की कोणाची? कोणासाठी? रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानके फक्त शोभेसाठी उभारली आहेत का? आम्ही वारंवार मागणी करूनही नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकावर थांबा मिळालेला नाही, याचे कारण काय आहे नेमके? आमच्या पत्रांना, अर्जांना, मागण्यांना आणि आवाहनांना कधीतरी थातूरमातूर कारणे सांगून आमची बोळवण केली जाते. इतक्या बेपर्वाईने आमच्या मागण्यांकडे हे अधिकारी बघतात. केवळ दक्षिणेकडील प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी कोकण रेल्वे उभारायची होती तर कोकणात रेल्वे स्थानके उभारलीच कशाला? केवळ नजरेसमोरून वेगाने जाणार्‍या गाड्या पाहण्यासाठी का? बरे, ज्या गाड्यांवर आम्ही विसंबून आहोत, त्या कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. आज भले कितीही विजेवर चालणारी गाडी, वेळेची बचत अशा गप्पा मारल्या जात असल्या, तरी कोकणकन्या, मांडवी, तुतारी, दिवा- रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी या गाड्या जेव्हा गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचतील, तेव्हा कोकण रेल्वेला एखाद्या पुरस्कार देऊन सत्कार केला पाहिजे. ज्या दिवशी चाकरमानी वेळेवर आपल्या स्थानकावर उतरेल तेव्हा बहुतेक तो आपल्या घरीच काय, त्या रेल्वे स्थानकावर सत्यनारायणाची महापूजाच घालेल.

सणासुदीला आणि मे महिन्यात कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या चार महिने आधीच फुल्ल होतात. ऑनलाइन बुकिंग करूनही तिकीट कन्फर्म होत नाही. वेटिंग हा शब्द आता कोकणच्या सर्व आबालवृद्धांसाठी परिचित झाला आहे. कोकणी माणूस कायमस्वरूपी ‘वेटिंग’वरच राहिलेला आहे. त्याला पुढे येऊच दिले जात नाही. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, पनवेल येथून कोकणात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. शिमगा, गणपती आणि उन्हाळ्याची सुट्टी ही कोकणात जाणार्‍यांसाठी पर्वणीच असते. पण कोकण रेल्वेकडून या काळात जादा गाड्यांची म्हणावी तशी तजवीज होत नाही. शिवाय सुविधांच्या नावाने ठणाणाच आहे. तास-दोन तास उशिरा चालणार्‍या गाड्यांचा गोंधळ पाचवीलाच पुजलेला आहे. आहेत त्या स्थानकांवर सगळ्या गाड्या थांबत नाहीत. मग हे ‘थांबे’ कशासाठी? सध्या या मार्गावर १० क्रॉसिंग स्थानके करण्यात आली आहेत. त्यांचा कोकणवासीयांना नेमका फायदा काय आहे, हे कोणी समजून सांगेल का? बाहेरच्या गाड्यांना प्राधान्य देऊन कोकणातील गाड्या मागे ठेवण्यात प्रशासनाला फार मोठा पराक्रम केल्यासारखे वाटते.

कायम वेळकाढूपणा हा तर कोकण रेल्वे प्रशासनाचा स्थायिभाव झालेला आहे. त्याबद्दल तक्रार करायला गेल्यास त्याची दखल कधीच घेतली जात नाही. तक्रारीचा कागद वाचायचा, पण त्यांना कंटाळा आहे. ‘चाललीय ना आपली ढकलगाडी… मग दुनिया गेली तेल लावत’ असा त्यांचा कारभार आहे. ही दुनिया म्हणजे कोकणचे चाकरमानी प्रवासी. त्यांच्या हालांना पारावार उरलेला नाही.

आम्हाला तर असे वाटते की, कोकण रेल्वे फक्त गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांतील प्रवाशांच्या हितासाठीच सुरू झालेली आहे. कोकणवासीयांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला ना वेळ आहे, ना इंटरेस्ट. नवीन गाड्यांना थांबा मिळावा म्हणून मागणी केली, तर प्रशासन ठरावीक छापाचे उत्तर देते की, या स्थानकांतून आरक्षित तिकिटांचीच विक्री होते. रेग्युलर प्रवासी नसतात, त्यामुळे लॉस होतो, गाडी थांबवली तर प्रवासी मिळत नाहीत, त्यामुळे वेळ जातो… वगैरे. संगमेश्वर स्थानकात प्रवासी आरक्षण केंद्रच नाही. कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडे खूपच कमी आरक्षण कोटा दिला आहे. तो एकूण क्षमतेच्या फक्त १८ ते २० टक्केच आहे. पोस्टात आरक्षणाची सुविधा आहे, पण ते पोस्ट ऑफिस स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. तिथले इंटरनेट बेभरवशाचे आहे. प्रवासी स्वतःच्या मोबाइलवर तिकीट काढतात आणि ते कन्फर्म होण्याची वाट बघतात. ते कधीच कन्फर्म होत नाही आणि मग रद्द होते. रद्दीकरण शुल्क आणि दंड असा दुहेरी फटका बसतो तो वेगळाच. शिवाय वेळ, पैसा आणि श्रम वाया गेल्याचा मनस्ताप होतो, तो वेगळाच.

मांडवी एक्स्प्रेसला रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड आणि माणगावसाठी ९८ तर मडगाव ते आडवलीसाठी साधारण ४४५ जागा निर्धारित केल्या आहेत. कोकणकन्याला मडगाव ते विलवडेसाठी ४१० आणि रत्नागिरी ते खेडपर्यंत फक्त ९६ जागांचा कोटा आहे. इतकी तफावत का? आम्ही काय घोडे मारले आहे? आमच्या वाट्याला इतक्या कमी जागा का?
संगमेश्वर स्थानकावर रेल्वे तिकीट आरक्षण खिडकी नाही. स्टेशनचा परिसर कितीही काम केले तरी कायमच अस्वच्छ असतो. स्टेशन मास्तरला प्रवासीवर्गाशी कसे बोलायचे, याची शिस्त नाही. मध्यंतरी आम्ही आवाज उठवला तेव्हा मोडलेली निवारा शेड दुरुस्ती केली. पण हे प्रशासनाला स्वतःला दिसत नाही का? प्रत्येकवेळी प्रवासी, चाकरमानी, संघटना, एखादा ग्रुप, एखादा समाजसेवक यांनीच आवाज उठवायचा का?

आता हे सगळे दिवसेंदिवस सहनशक्तीपलीकडचे होत चालले आहे. कोकणी माणूस कायम संवेदनशील आहे, तसाच तो सहनशीलही आहे. पण जेव्हा अन्यायाचा कडेलोट होतो, तेव्हा त्याच्या आतला अंगार फुलतोच. कोकण रेल्वे प्रशासनाला या अंगाराला सामोरे जायचे नसेल, तर कोकणच्या प्रवाशांच्या योग्य असलेल्या मागण्या मान्य करून आपल्या शहाणपणाचे दर्शन घडवावे. अन्यथा या मुजोर कारभाराला कसे उत्तर द्यायचे ते कोकणी माणसांना चांगलेच माहीत आहे. ती वेळ येऊ नये, याचसाठी पोटतिडकीने आणि संतापावर संयम ठेवून हा लेख लिहिला आहे. हा इशारा समजा, सूचना समजा, आग्रह समजा… काहीही समजा. पण कृपा करून कोकण रेल्वे प्रशासनाने आमच्या योग्य असलेल्या समस्या किमान एकदा तरी गांभीर्याने सोडवण्यासाठी वेळ काढावा! अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, याची खूणगाठ कोकण रेल्वे प्रशासनाने बांधून ठेवावी.

  • संदेश सुरेश जिमन (पत्रकार), संगमेश्वर
  • 8652233676 / 9819200887

संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील दुरवस्थेची झलक

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply