राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवाठी माध्यमिक विद्यालयातील सहायक शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुक्यातील चौतीस केंद्रांतील ३३८ प्राथमिक शाळांमध्ये श्यामची आई व उपस्थित केंद्रप्रमुखांना शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट म्हणून दिले.
केंद्रशाळा राजापूर क्र.२ (वरची पेठ) येथे केंद्रप्रमुखांची सहविचार सभा पार पडली. त्यावेळी हा पुस्तकभेट कार्यक्रम झाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, विस्तार अधिकारी प्रकाश पाध्ये, संजीव वडके, केंद्रप्रमुख सुनील जाधव, सीताराम कोरगावकर, संगीता खाडे, रमाकांत शिवगण, विषयतज्ञ महेश हळदवणेकर, समीर तांबे, तन्वीर खान, शशिकला लोंढे, सुमती पेंडखळकर, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार पंडित, राजापूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक महादेव गोठणकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव कोंडविलकर, पतपेढीचे संचालक मेघनाथ गोसावी, जुवाठी विद्यालयाचे लिपिक राजेंद्र मयेकर व तालुक्यातील केंद्रप्रमुख शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व गोंडाळ यांच्या ग्रंथालय चळवळीची माहिती जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे सचिव सुनील जाधव यांनी दिली. गोंडाळ यांनी पुस्तकभेट देण्यामागील आपली भूमिका सांगितली. गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांनी गोंडाळ यांच्या कार्याचे कौतुक केले.
बी. के. गोंडाळ यांचा वाढदिवस २२ ऑगस्ट रोजी असतो. यावर्षी त्यांचा ५०वा वाढदिवस होता. गोंडाळ यांनी यापूर्वी आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. पण हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी केक न कापता जुवाठी गावातील पंधरा विधवा मातांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. त्यांच्याकडूनच औक्षण करून घेतले. कणकवली येथील साहित्यिक सरिता पवार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवले होते. यादरम्यान श्यामची आई पुस्तक भेट देण्याचे नियोजित होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. तो पुस्तकभेटीचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

