राज्य पतसंस्था फेडरेशनवर दीपक पटवर्धन बिनविरोध

रत्नागिरी : राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. श्री. पटवर्धन यांच्या या निवडीबद्दल जिल्हा बँकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सत्कार केला. सत्कार समारंभाला संचालक बाबाजी जाधव, संजय रेडीज, रमेश कीर, जयवंत जालगावकर, राजेंद्र सुर्वे, श्री. चव्हाण, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, अजित यशवंतराव आदी संचालक आणि मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली. फेडरेशनच्या २१ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ७२ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र कोयटे यांनी जोशी यांच्याशी चर्चा करून अंतिम २१ जणांची नावे उमेदवारीसाठी जाहीर केली होती. त्यातील भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, महिला आरक्षित प्रवर्ग आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून १६ जागांसाठी २० अर्ज होते. हे अतिरिक्त चार अर्ज बुधवारी (दि. २१ डिसेंबर) माघारीच्या अंतिम दिवशी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे काकासाहेब कोयटे यांनी सांगितले.

फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी १९९० सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले असून, गेली १४ वर्षे ते अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. राज्यभर १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणाऱ्या या संस्थांचे सव्वादोन कोटी सभासद असून, दोन लाखांवर पदाधिकारी आहेत. या १६ हजार संस्थांच्या तब्बल ५० हजार शाखा आहेत. त्यातील दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनिधींमार्फत राज्यभरातील एक कोटी कुटुंबांशी, म्हणजेच सुमारे चार कोटी व्यक्तींशी या पतसंस्था चळवळीचा संपर्क येतो. फेडरेशनचे शिर्डी येथे स्वत:चे अद्ययावत व सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्रही आहे.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (अहमदनगर), वसंत शिंदे (मुंबई), राधेश्याम चांडक (बुलडाणा), दादाराव तुपकर (जालना), डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद), शशिकांत राजोबा (सांगली), चंद्रकांत वंजारी (ठाणे), ॲड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पुणे), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), नारायण वाजे (नाशिक), राजुदास जाधव (यवतमाळ), सुरेश पाटील (रायगड), ॲड. अंजली पाटील (नाशिक), भारती मुथा (पुणे) व शरद जाधव (पालघर).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply