पक्षाचे चिन्हच देऊन टाकावे

रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. साडेसात हजाराहून अधिक ग्रामपंचायत सदस्य आणि ५०० हून अधिक सरपंचांची निवड करण्यासाठी ही निवडणूक झाली. विधानसभेसारख्या मोठ्या निवडणुकीचे स्वरूप या निवडणुकांना आले होते. निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर राज्यातल्या प्रमुख चार पक्षांनी आणि त्याच पक्षांपासून तयार झालेल्या दोन वेगवेगळ्या आघाड्यांनी आपण सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका निकोप वातावरणात व्हाव्यात, गावात सर्वच लोक एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्यामध्ये पक्षीय वाद निर्माण होऊ नयेत, गावाच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तसे संकेत आहेत. पण निवडून आल्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना दिसतात. तसे होणार असेल, तर ते मूळ लोकशाही निकषांनाच बगल देणारे ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील उमेदवारांनाही यापुढे पक्षाची चिन्हेच द्यावीत, हे बरे.

गावातील वातावरण निकोप राहावे, हा मूळ उद्देश सध्या पूर्णपणे धुळीला मिळालेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या सर्व निवडणुकांना लढाईच्या आखाड्याचे स्वरूप दिले आहे. त्यातून अनेक गमतीजमतीही घडत असतात. एकाच कुटुंबातील दोन वेगवेगळ्या व्यक्ती दोन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधित्व करून निवडणूक लढवत असतात. त्यामुळे गावाचे नव्हे तर कुटुंबाचे वातावरणही निकोप राहिलेले नाही. तूर्त अशी उदाहरणे अपवादात्मक असली, तरी दोन पिढ्यांमधील अंतर नेहमीच राहणार असल्यामुळे आई किंवा वडील एखाद्या पक्षाचे, तर मुले दुसऱ्या पक्षाची अनुयायी असू शकतात. सासूसासऱ्यांचा एक पक्ष, तर सून वेगळ्याच पक्षात असते. त्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडविण्याचे कामही या पक्षीय राजकारणाने केले आहे. निवडणुकीपुरते राजकारण असे म्हणणारे सारेजणच रोजचा दिवस निवडणूक असल्यासारखेच वागत असतात. त्यामुळे कायम असंतोषच वावरत असतो. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जात नसतील, तर मग हे प्रमुख पक्ष जेव्हा आपल्या विजयाचा दावा करतात, तेव्हा तो लोकशाहीचा मूळ तत्त्वालाच थेट धक्का देणारा आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसेल तर त्या जागा आपण लढविल्या किंवा जिंकल्या, असे ते पक्ष कसे काय सांगू शकतात, हा प्रश्नच आहे. लोकशाहीचा आधार घेऊनच राजकीय पक्ष लोकशाहीशी प्रतारणा करत असतात. त्यामुळे एक तर पक्षांना असा दावा करण्यापासून परावृत्तच करायला असे नव्हे, तर असा दावा करणाऱ्या पक्षांना, त्यांच्या नेत्यांना शिक्षा होईल, अशी काहीतरी सुधारणा निवडणुकीच्या बाबतीत करायला हवी किंवा निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा पक्षाच्या चिन्हावरच पक्ष म्हणूनच लढवू देण्याची परवानगी द्यायला हवी. नाही तरी मुळात वाद निर्माण होतच असतात. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली, म्हणून त्यातून आणखी काही वेगळे घडेल, असे नाही. झालेच तर चांगले होऊ शकते. ते म्हणजे प्रत्येक गावातील पक्षीय चित्र त्या निवडणुकीतून निर्माण होऊ शकते. त्यामुळे अधिक स्पष्टता येऊ शकते. निवडणुकीच्या नियमांमध्ये तसे बदल जरूर करायला हवेत. नाहीतरी पक्षीय निष्ठा अलीकडे राहिलेलीच नाही. पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जात असले तर त्यात फारसे नवल नाही, पण पक्षाचे प्रमुख नेते किंवा पक्षाचा अध्यक्षच संपूर्ण पक्षासह दुसऱ्या पक्षात सामील होतात. आपल्या पक्षाचे अस्तित्वच नष्ट करून टाकतात. तेथे पक्षविरहित निवडणुकीचा अभिनिवेश हवाच कशाला? पक्षचिन्हांवर निवडणूक लढविण्याची रीतसर अनुमती देऊन काय ती स्पष्टता येऊ द्यावी.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २३ डिसेंबर २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply