चिपळूण : उद्या (दि. २२ जानेवारी) आकाशात शुक्र आणि शनी ग्रहांच्या युतीचा विलक्षण नजारा पाहायला मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चिपळूण येथील तारांगण ग्रुपचे दीपक आंबवकर यांनी केले आहे.
गेल्या डिसेंबरपासून श्री. आंबवकर यांनी अवकाश निरीक्षणाचे ११ कार्यक्रम केले आणि १००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि खगोलप्रेमींना आकाश दर्शन घडविले. अवकाश निरीक्षण करीत असताना त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सतत अवकाश निरीक्षणात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे यावर्षी मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चारही ग्रह डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ या महिन्यात एकाच वेळी पाहायला मिळाले. शुक्र १५ डिसेंबरनंतर आकाशात दिसायला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याचा मावळण्याचा वेळ वाढत गेला. शनी मात्र वेगाने रोज पश्चिमेकडे प्रचंड वेगाने सरकताना दिसला. या दोन ग्रहांची युती रविवारी आहे. हे दोन ग्रह एकमेकांच्या एकदम जवळ आलेले दिसतील.
रविवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर सायंकाळी ७.१५ वाजल्यानंतर बऱ्यापैकी अंधार पडायला लागलेला असेल. त्यावेळी पश्चिमेला तोंड करून उभे राहिल्यास एक तेजस्वी चांदणी आकाशात दिसेल. ती चांदणी म्हणजे शुक्र ग्रह आहे. बरोबर त्याच्या अगदी जवळ वरच्या बाजूला पिवळसर अंधुक एक चांदणी दिसेल ती चांदणी म्हणजे शनी ग्रह असेल. हे ग्रह आकाशात अगदी जवळ आलेले दिसले तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असणार आहेत.
लगेचच दुसऱ्या दिवशी २३ जानेवारी रोजी बरोबर उलट परिस्थिती दिसणार आहे. ती म्हणजे शनी ग्रह शुक्राला ओलांडून पश्चिमेकडे गेलेला दिसेल. या दिवशी शनी खाली असेल तर त्याच्या बरोबर वरच्या बाजूला शुक्र ग्रह असेल. हे दोन्ही दिवस खगोल निरीक्षकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्ही दिवशी या ग्रहांच्या स्थानात होणारा बदल उघड्या डोळ्यांनी चांदणीच्या स्वरूपात पाहता येणार आहे. दुर्बिणीतून हे दोन्ही ग्रह एकाच वेळी एकाच लेन्समधून पाहता येणार आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि खगोलप्रेमींनी या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. आंबवकर (9552295595) यांनी केले आहे.

