ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी (दि. २२ जानेवारी) दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

वाढीच्या व विकासाच्या दृष्टीने माणसाच्या आयुष्याचे बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धावस्था असे चार भाग पडतात. घरातील वृद्ध व्यक्तींचा अनुभव नेहमी आपल्या कामी येतो, यामुळे वृद्धांचा सन्मान आदर झालाच पाहिजे. या ज्येष्ठ नागरिकांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे रविवारी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी दापोलीतील आझाद मैदानावरून सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ती केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- पंचायत समिती- गणेश दत्तात्रय दातार वृद्धाश्रम- नटराज नाका- पोस्ट ऑफिस या मार्गाने पुन्हा आझाद मैदानावर येईल. ही ५ किलोमीटरची फेरी आहे. या सायकल फेरीदरम्यान दापोलीतील गणेश दत्तात्रय दातार वृद्धाश्रमामध्ये जाऊन तेथील कार्याबद्दल जाणून घेण्यात येईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ९६७३७५०५५८, ९०२२८७४८८१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्य सायकलविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply