Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आदिशंकराचार्य जयंतीनिमित्त रत्नागिरीत आज व्याख्यान

Advertisements

रत्नागिरी : येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त आज, रविवारी (१२ मे) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

वैशाख शुक्ल पंचमीला, १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. वेदमूर्ती सचिन भाटवडेकर आद्य शंकराचार्यांचे स्तोत्रवाङ्मय या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

आदिशंकराचार्यांचा जन्म सन ७८८मध्ये वैशाख महिन्यातील शुक्ल पंचमीला झाला. आदिशंकराचार्यांनी वयाच्या आठव्या वर्षी सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी भारतभ्रमण करून चारही दिशांना चार पीठांची स्थापना केली. गोवर्धन पुरी मठ (जगन्नाथ पुरी), शृंगेरी पीठ (रामेश्वरम्), शारदा मठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (बद्रीनाथ धाम) येथे त्यांनी हे मठ स्थापन केले होते. त्यांनी अनेक प्रकारची स्तोत्ररचनासुद्धा केली. त्यासंबंधी श्री. भाटवडेकर व्याख्यान देणार आहेत.

वेदमूर्ती सचिन भाटवडेकर आवळेगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आहेत. त्यांनी शालेय शिक्षणानंतर पाठशाळेत संपूर्ण याज्ञिक आणि संस्कृत एमए, बीएडपर्यंत शिक्षण घेतले आहे. श्रीमद्भागवत कथा, रामायणकथा सांगण्याचा त्यांचा व्यासंग आहे. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सचिव जयराम आठल्ये आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version