Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ग्रामीण साहित्य संमेलनाचा संस्मरणीय सोहळा

Advertisements

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेने दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या प्रारंभी वाटूळ (ता. राजापूर) येथे साजरे केले. त्याला दोन महिन्यांचा काळ लोटला असला, तरी त्याच्या स्मृती अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात जाग्या आहेत. कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून या संमेलनाविषयीचे विचार.

……………………………….

संमेलन यशस्वी करणारे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे स्थानिक कार्यकर्ते

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचेच दहावे ग्रामीण साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या काळात साजरे झाले. राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे झालेला हा सोहळा एवढा देखणा आणि अचंबित करणारा होता की त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे व आकाश ठेंगणे वाटते. नियोजन एवढे आखीव-रेखीव होते की कोठे बोट ठेवण्यास वाव नव्हता. हे कसे घडवून आणले असेल, याचे कौतुक वाटते.

या सरस्वतीच्या स्वागतासाठी जागेची निवडही नियोजनबद्ध होती. डोंगराच्या उतरणीला स्वामी गगनगिरी महाराजांचे पवित्र देऊळ, त्याला लागून खळखळता वाहणारा पऱ्ह्या, त्यावर लाड सरांच्या कल्पनेतून मंदिर से कार्यस्थळापर्यंत येण्याजाण्यासाठी मेहनतीने उभारलेला साकव, हिरवी गर्द झाडे, मध्येच देखणा सभामंडप, उजव्या बाजूला मुंबई गोवा महामार्ग, दक्षिणेला लहान दुतर्फा झाडे, उत्तरेला विस्तीर्ण तिठा परिसर जणू सभामंडपला पर्यायाने सरस्वतीला विणलेला सर (आपण ज्याला नेकलेस म्हणतो) किती नयनरम्य, आल्हाददायक वातावरण निर्मिती होती ती. एखाद्या खेडेगावात असा कार्यक्रम करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. सुळावरची पोळी शेकविण्यास अध्यक्ष सुभाष लाड, आयोजक विराज चव्हाण समर्थ होते. त्यांचे तोंडभरून कौतुक करावे तेवढे थोडेच. शामियान्यासमोर उभारलेली झोपडी सर्वांना आकर्षित करीत होती. आत कंदील, लाकडी बैठक, समोर बैलगाडी एकदम चांगला फिल येत होता.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३० जानेवारीला रणरागिणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत पूर्वीच्या सर्व संमेलनांच्या ठिकाणी फिरून वाटूळ येथे आली. संध्याकाळी ग्रंथपालखी आणि क्रांती ज्योत गावातील प्रार्थनास्थळांना भेट देत विराजमान झाली.

दुराऱ्या दिवशी गगनगिरी महाराज मठात रांगोळी स्पर्धा पार पडली. शालेय विद्यार्थिनी व परिसरातील इतर स्पर्धकांनी विविध विषयांवर सुबक व देखण्या रांगोळ्या काढल्या. त्यातून क्रमांक काढताना परीक्षकांची खूप दमछाक झाली. एक परीक्षक विजयराज बोधनकर यांची चित्रे लोकांच्या मनात घर करून गेली. सुनील बारसकरांच्या शिवकालीन प्रदर्शनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी महाराजांची पत्रे, सही असे विविध पैलू पाहायला मिळाले. दुपारी पाककला स्पर्धेत ग्रामीण गृहिणी किती निपुण आणि सुगरणी आहेत, याचा प्रत्यय आला. करवंदे, फणस, सुरण, दुधाचा चीक, नारळ, नाचणी, भोपळ्याचे घारगे, वड्या, विविध चटण्या, पूसभाजी यांची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.

संध्याकाळी मुचकुंदी नदी जलपूजनाचा दिमाखदार कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, वारकरी यांनी भाग घेऊन भजन, पूजा, आरती केली. प्रमुख अतिथी भारताचार्य सु. ग. शेवडे, हभप अमोल अशोक महाराज मोरे (देहू येथील संत तुकाराम महाराजांचे १२ वे वंशज) यांच्या व संमेलन अध्यक्ष दिनकर गांगल, मंडळाचे अध्यक्ष सुभाष लाड वगैरे मान्यवरांच्या उपस्थितीत नदीपूजनाचा आगळावेगळा कार्यक्रम दिव्यांच्या नेत्रदीपक रोषणाईने पार पडला. नदी व पाण्याच्या उपकारांची परतफेड म्हणून हा अल्पशा प्रयत्नाने उतराई होण्याचा प्रयत्न होता. रात्री वाटूळ गावचे तांबळवाडीचे वारकरी संप्रदायाचे हभप बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांचे कीर्तन झाले.
संमेलनाच्या मुख्य दिवशी, १ फेब्रुवारी रोजी सकाळी वाटूळ तिठा ते साहित्य संमेलन नगरी ग्रंथदिंडी निघाली. घोड्यावर स्वार शिवाजी महाराजांच्या वेषातील आपले आदर्श शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, पारंपरिक वेषातील ग्रामस्थ फेटे बांधून यात्रेची शोभा वाढवीत होते. ढोल, तासे, लेझीमच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने सर्व लोक हिरीरीने भाग घेत आपला आनंद प्रकट करीत होते. येथून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी मंडपात पोहोचल्यावर प्रथेप्रमाणे वाटूळ गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती नीताताई नवीन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली. त्यानंतर विविध कक्षांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्तविक संघचिटणीस प्रमोद पवार, स्वागताध्यक्ष हभप बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांनी संबोधित करून कार्यक्रमास दिशा दिली. युवा व्यासपीठावर युवक-युवतींनी आपल्या बुद्धीची चमक दाखविली. या वयातील त्यांची मांडणी भुरळ घालणारी होती. दुपारी साहित्य विचार व्याख्यानात विविध विषयावर तज्ज्ञांनी भाग घेऊन आपले विचार मांडले. लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांची मुलाखत दिनेश मोरे यांनी घेतली. त्यामध्ये दोघांनीही वाहवा मिळविली. शाहीर सौरभ कर्डे यांनी शिवव्याख्यानात सर्वांच्या अंगावर काटा उभा केला. अंगार पेटवून धमन्यांमधले रक्त सळसळू लागले. मूर्तिमंत शिवराय उभे करून सर्वांना स्तब्ध करून मानाचा मुजरा घेतला. सांजवेळी विभिन्न वयातील नवोदित कवी-कवियित्रींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना जग विसरायला लावले. रात्री नियमित कविसंमेलन झाले. सर्वांनी ताकदीने सादरीकरण करून सर्वांना खिळवून ठेवले, पण लक्षात राहिले ते संजय गुरव. आम्ही वेडे झालो. आयोजक विराज चव्हाण यांनी कविता सादर करून वाटूळ गावचे प्रतिबिंब उभे केले. रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम तर बहारदार झाला. रजनी कलादर्पण यांच्या भक्तिरंग कार्यक्रमातील शेवटच्या टप्प्यात “स्वामी कृपा कधी करणार?” या आर्त स्वरातील भैरवीने षड्ज (सा) हृदयाला भिडला. आलापही सुंदर होती. गंधार तर अप्रतिम.

अखेरच्या दिवशी, २ फेब्रुवारी २०२५ रोजी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणा समारंभाचे उ‌द्घाटन झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन विजय हटकर आणि प्रकाश हर्चेकर या दोघांनी एवढ्या खुमासदार व चपखल शब्दांत केले की, ते प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर करून राहिले. हटकरांचे विशेष कौतुक. राजकारण्यांनी प्रथेप्रमाणे गैरहजेरी लावून आपण साहित्य, संस्कृती कला याबाबत आपण किती उदासीन आहोत हे दाखवून दिले.

पहिला उद्योगभूषण पुरस्कार पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना प्रदान

संयोजक विराज विलास चव्हाण यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून इतरांच्या भाषणांना वेळ उपलब्ध करून दिली. नोंद घेण्यासारखा एक सत्कार समारंभ म्हणजे मुंबईच्या मुलींनी घर उघडे ठेवण्यासाठी ग्रामीण शेतकऱ्याशी केलेले लग्न. ओसाड जमिनीबरोबर पडलेली घरे, नष्ट होऊ पाहणारी संस्कृती, शेती यांची जपणूक व्हावी हा उद्देश त्यात होता. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन त्यात आणखी अनेक तरुण समाविष्ट होतील व आपले कोकण राहील, अशी अपेक्षा आहे.

संमेलनाध्यक्ष लेखक ग्रंथालीचे सर्वेसर्वा सिद्धहस्त लेखक दिनकर गांगल, भारताचार्य सु. ग. शेवडे या नामवंतांचा सत्कार आपल्या गावात व्हावा, ही किती प्रसन्न करणारी गोष्ट आहे! त्यांचे व्यक्तिमत्त्व मोहिनी घालणारे होते. दुसरे सत्कारमूर्ती तळवडे (ता. राजापूर) येथील सुपुत्र उद्योजक, पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांच्या सत्कारानेही १० व्या ग्रामीण साहित्य संमेलनाला शोभा आली. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद लाभलेले हे गृहस्थ मृदू आणि सौम्य भाषेत सर्वांशी बोलत होते. त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले की, मी माझ्या उत्पादनाबरोबर तुमची उत्पादनेदेखील परदेशात नेईन. केवढा दिलासा, पाठीवर थाप दिली आहे! नवीन उत्पादकउद्योजक यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. दिवंगत नेते, लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांना १०० कोटीवर उलाढाल करून दाखवून आपला इरादा स्पष्ट करून काम करी पितांबरी हे ब्रीदवाक्य त्यांच्या उद्योगाने सिद्ध केले. तरीही पाय जमिनीवर आहेत. उदारता, सहायता समाजाविषयी असलेली आपुलकी, अविरत कष्ट हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.
त्यानंतर संमेलनाचा परमोच्च बिंदू म्हणजे जागतिक कीर्तीचे प्रवचनकार भारताचार्यांचा सन्मान. त्यांची देश-विदेशात हजारो व्याख्याने झाली आहेत. हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते, सनातन धर्माचे आधारस्तंभ, शिवरायांचे उपासक आपल्या गावचे म्हणजे वाटूळ गावचे आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती आणि त्यांचा सत्कार यामुळे साहित्य संमेलन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भारताचार्य सुरेशजी ग. शेवडे यांची वामनमूर्ती, प्रसन्न मुद्रा आणि हिमालयाची उंची गाठलेले, आपल्या बुद्धिमत्तेने तोंडात बोटे घालण्यास लावणारे हे गोड व्यक्तिमत्त्व, मृदू पण ठाम उच्चार, हिंदुत्व आणि आपले दैवत शिवाजी महाराज यांच्यावर बोलताना तोंडातून निघणारे उच्चार, भाषेची मांडणी, जाज्वल्य विचार मांडताना डोळ्यांतील अंगार, हिंदु संस्कृतीवर निष्ठा, तेवढ्याच तोडीचे भक्तिमार्गातील त्यांचे योगदान ९० व्या वर्षीदेखील त्यांना लाभले. त्यांचा एवढा उत्साह पाहून ही दैवी शक्ती नव्हे का, असा विचार मनात येतो. किती सुदैवी आहोत आपण सारे. म्हणूनच ही माणसे मोठी आहेत.

दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट होते ते अक्षर चळवळ, उद्योग चळवळ, भक्ती चळवळ यांना ऊर्जितास्था प्राप्त करून लोकांना निरामय जीवन जगण्याची उमेद वाढवायला मदत करणे. हाच तर खरा कुंभमेळा, त्रिवेणी संगम होता, ज्यात सर्वजण न्हाऊन निघाले. विचाराने, संस्काराने शूचिर्भूत होऊन निघाले. असल्या कार्यक्रमाद्वारे समाजाला जगण्याची उमेद मिळते. ताणतणावमुक्त होऊन निखळ हसणे, अंतर्मुख होऊन विचार करावयास लावणे, समाजाविषयीची जाणीव, संस्कार यांची ओळख होऊन एक माणूस म्हणून ताठ मानेने वावरण्याची शक्ती मिळते. एक व्यक्ती म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगणे या जगतात किती महत्त्वाचे आहे हे समजते. गाव जिवंत किंवा प्रवाही आहे केव्हा कळते? असले समारंभ, भजन-कीर्तने, विविध चळवळी याद्वारे समजते.

संमेलन सफल झाले, अपेक्षेपेक्षा उद्देश यशस्वी झाला, असे मला वाटते. काही इतर करमणुकीच्या कार्यक्रमापेक्षा याद्वारे आपले प्रबोधन होऊ शकते. मुलांना तुम्ही कितीही खायला द्या, शिकवा, शिक्षण द्या, पैसा द्या, पण संस्कार करून माणूस म्हणून जगायला शिकवा. ते अशा माध्यमातूनच होऊ शकते. संवेदना जागृत करण्याचे हेच तंत्र आणि मंत्र आहे. यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतातच. साहित्य हा महासागर आहे. त्यातील ठेवा वाचलात तर वाचाल, प्रगल्भ व्हाल. आपल्या मातृभाषेतूनच प्रबोधन होते. म्हणून वाचले पाहिजे. आपण संसार जीवन जगण्यासाठी जीविकेच्या द्वारे अर्थार्जन करून आपल्या ऐहिक गरजा भागवू शकतो. पण आपली मानसिक गरज भागविण्यास अर्थात संगीत, पाककला, वाचन, लेखन काव्य, पर्यटन इतर कोणताही छंद असू द्या यातून मनोरंजन, आनंद आवश्यक असतो. हा आनंद इतरांना आपण देऊ शकतो. साहित्य उपक्रमामुळे तरुणवर्ग आकर्षित होऊन क्षितिजाची दारे किलकिली करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. १० पैकी एक-दोघांनी अशी कवाडे उघडली तरी खूप झाले.

या संमेलनाचे फलित म्हणजे विराज चव्हाण यांच्यासारख्या रत्नाचा लागलेला शोध. काय आवाका त्यांचा, सर्वत्र वावरणे संमेलनावर हा तरुण जणू विराजमान झाला होता. आमचा ऊर अभिमानाने भरून आला. एक नवे उमदे तरुण सर्वसमावेशक नेतृत्व उभारी घेत आहे. त्याला उत्तम भविष्यकाळ आहे. आपण घरातील पाच माणसे एकत्र एक दिवस ठेवू शकत नाही आणि या पठ्ठ्याने आपल्या आजूबाजूच्या गावातील परिसरातील गावांवरही लक्ष ठेवून शाबासकी मिळवली. संघाध्यक्ष सुभाष लाड सर जणू ड्रोन कॅमेऱ्याने सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून होते. त्यांच्या कार्याने सर्वांना भुरळ घातली. केवढी ऊर्जा! न थकता सर्व सोपस्कार करत होते.

अशा तऱ्हेने संमेलन पार पडल्यानंतर ध्वज संघाध्यक्ष सुभाष लाड यांच्या हस्ते राष्ट्रगीत होऊन उतरवण्यात आला. पारंपरिक भाषेत सांगायचे तर साहित्य संमेलनाचे सूप वाजले. शेवटी संत उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणावेसे वाटते-

हातीचे न सांडावे देवे ।।
हे शरण आलो जीवेभावे
आपुले ऐसे म्हणावे ।।
करितो जीवे लिंबलोण ।।

बैसता संतांची पंगती ।।
कळो आले कमळापती ।।
या उपरी पांडुरंगा।।
काय बोलो सांगा ।।

या कार्यक्रमाने सर्वांच्या खांद्यास खांदा लावून कार्य करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांची अशीच अवस्था झाली. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या गाण्यात सांगाये, तर शब्दावाचून कळले सारे।। शब्दांच्या पलीकडले ।। ही अनुभूती आली.
धन्यवाद.

(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ एप्रिल २०२५ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाची चित्रमय झलक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version