वाटूळ येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिनकर गांगल

राजापूर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे यावर्षीचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावी ३१  जानेवारी  ते २ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान होणार असून या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ग्रंथालीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांची निवड करण्यात आली आहे.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. गांगल यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले.

वय वर्षे ८६ असलेले श्री. गांगल कमालीचे साधे, प्रेमळ विनम्र, ठाम आणि सुस्पष्ट विचार असलेले महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा येथे २०११ साली झालेल्या तेराव्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी साकारलेली महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी विशेष गाजली होती. त्यांना फीचर रायटिंगसंबंधात थॉम्‍सन फाउंडेशन पाठ्यवृत्‍ती मिळाली होती. त्‍याआधारे त्‍यांनी देशविदेशात प्रवास केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत, घडामोडीत, जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांची माया माध्यमांची, कॅन्सर डायरी (लेखन-संपादन), शोध मराठीपणाचा (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), क्षितिज अपार आणि स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्‍ट्र सरकारचा सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्‍कार, मुंबई मराठी साहित्‍य संघ व मराठा साहित्‍य परिषदेचे संपादनाचे पुरस्‍कार, जागतिक मराठी परिषदेचा जीवनगौरव पुरस्‍कार आणि वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल यशवंतराव चव्‍हाण पुरस्‍कार प्राप्त झाला आहे. श्री. गांगल यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करत तसेच भेटीस गेलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी केली. संघाकडे असलेल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहून कुतूहल व्यक्त करून आपण या साहित्य संमेलनाला एक दिवस अगोदर येऊन थांबणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर संमेलन संपल्यानंतर राजापूर लांजा तालुक्यातील काही प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार असल्याचे सांगितले.

संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी संघाच्या विविध उपक्रमांची आणि ग्रामीण साहित्य संमेलनांची वाटचाल श्री. गांगल यांना सांगितली. आमच्या मातीतल्या माणसांना आम्ही समर्थ करणार, हे घोषवाक्य घेऊ संघ काम करीत असून कोकणातील खेड्यापाड्यांच्या विकासासाठी आपापल्या परीने काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा संघाच्या माध्यमातून विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आपल्या कर्तृत्वाने कोकणाचे नाव सर्वदूर करणाऱ्या महानीय व्यक्तीला यावर्षीपासून कोकण भूषण पुरस्कार देण्यास संघाने सुरुवात केली असून यावर्षीचा पहिला पुरस्कार पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना देत असल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

श्री. लाड यांच्यासोबत दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संयोजक कवी विराज चव्हाण, गणेश चव्हाण, संघाचे खजिनदार सदानंद खामकर, मिलिंद कोटकर, प्रमोद मिस्त्री हे संघाचे पदाधिकारी तसेच श्री , वज्रमकर व सौ. नेहा लाड हे कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनकर गांगल यांना त्यांच्या निवासस्थानी संमेलनाध्य़क्षपदाचे निमंत्रण आणि शुभेच्छा देताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आणि कार्यकर्ते

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply