वाटूळच्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी संमेलनात भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार

राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार आहेत.

गेल्या दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे यावर्षीचे दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ (ता. राजापूर) या गावाला मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, स्वागताध्यक्ष हभप बाळकृष्ण मुरारी चव्हाण, सहसंयोजक महेंद्र साळवी, विजय हटकर यांनी गोव्यातील रामनाथी गावातील सनातन प्रभात संस्थेच्या मुख्य आश्रमात भारताचार्य सु. ग. शेवडे यांची भेट घेऊन या अक्षर सोहळ्याचे निमंत्रण त्यांना दिले. श्री. शेवडे यांनी ते स्वीकारले.

यावेळी सनातन प्रभात संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे,साधक भूषण कुलकर्णी, संघ पदाधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, मिलिंद कोटकर उपस्थित होते. संघाच्या वतीने सुभाष लाड यांनी भारताचार्य सु. ग. शेवडे यांचा शाल, श्रीफळ व संघाने प्रकाशित केलेली पुस्तके भेट देऊन सत्कार केला.

या वेळी श्री. शेवडे म्हणाले की, राजापूर तालुक्यातील वाटूळ हे आमचे मूळ गाव असून माझा जन्म बडोद्याला झाला असला तरी वाटूळ गावाने माझा काळीजकोपरा व्यापला आहे. वडिलांसोबत मी वाटूळला अनेक वेळा आलो असून इथला समृद्ध भवताल माझ्या नव्वदीतही माझ्या स्मरणात आहे. उन्हाळ्यात पाहुणे घरी आले की हमखास पिकणारा घरासमोरील रसाळ फणस, वाटूळ तिठ्यातील थोरला वड यांविषयीच्या आठवणीत शेवडे भावूक झाले. पुढे ते म्हणाले की, माझ्या वडिलांच्या कर्मभूमीत होत असलेले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल.

संमेलनाचे संयोजक विराज चव्हाण, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास चव्हाण यांच्यासह संघ कार्यकर्ते व वाटूळ ग्रामस्थ यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. कोकणाला मोठी साहित्यिक परंपरा आहे. ही परंपरा वाटूळ गावातील दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अधिक बळकट होईल, असा विश्वासही श्री. शेवडे यांनी व्यक्त केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply