Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पंतप्रधानांचा आदर्श घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान हवे – डॉ. विनय नातू

पंतप्रधानांचा आदर्श घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांचे योगदान हवे - डॉ. विनय नातू
Advertisements

रत्नागिरी : विकसित भारतासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान असावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प सभेत केले आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही योगदान हवे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.

भाजप दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज राष्ट्रसेवेचा आणि समर्पणाचा संदेश देणाऱ्या सेवा दीप यात्रेचे आयोजन केले होते. त्यानिमित्त स्वा. सावरकर नाट्यगृहात विकसित भारत संकल्प सभेत डॉ. नातू बोलत होते. ते म्हणाले, सेवा संकल्प यात्रा महिनाभर सुरू असून प्रत्येक मंडलात हे कार्यक्रम झाले. पक्षाकडून विविध कार्यक्रम येत राहणारच आहेत, त्यात राष्ट्र प्रथम या नात्याने सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. व्यासपीठावर भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ज्येष्ठ नेते अॅड. बाबासाहेब परुळेकर, अॅड. विलास पाटणे, जिल्हा सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.

अॅड. बाबा परुळेकर म्हणाले, याच सावरकर नाट्यगृहात गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्या हस्ते कै. सदूभाऊ पाटणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी त्या वेळेपासून केलेला संकल्प आजही सुरू असून त्याला २५ वर्षे झाली. त्यांचा आदर्श, प्रेरणा आपण घ्यायची असून राष्ट्रासाठी योगदान करावे.

अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले की, आज भाजपा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम राष्ट्रीय नेतृत्व देशाचे खरे आयडॉल आहेत. आज भारतात भाजपचे १८०० आमदार आहेत, १५ राज्यांत भाजपची सत्ता व २१ राज्यांत युतीची सत्ता आहे. २५ वर्षे मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सर्वोच्च पदांवर काम करताना नरेंद्र मोदी यांनी आदर्श निर्माण केला आहे.

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. आज त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २०४७ मध्ये असणारा विकसित भारत व राष्ट्रासाठी योगदान करण्याबाबत त्यांनी जाणीव करून दिली. जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान मोदीजींना शुभेच्छा पाठवल्या आहेत. भाजप सर्व स्तरावर मजबूत व्हावी, असा संकल्प आज केला आहे.

जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version