कौशल्यविकासातूनच आत्मनिर्भर भारत घडेल : डॉ. विनय नातू

दापोली : कौशल्यविकासातूनच आत्मनिर्भर भारत घडेल, असा विश्वास जनशिक्षण संस्थानचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी येथे व्यक्त केला.

माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या आणि सौ. उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामार्फत दापोली येथे रुहीक्षा कांबळे यांच्या लॉजिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आज ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण न करताच शहरांत सामान्य नोकरी करणे पसंत करतात, परंतु त्याऐवजी एखादे कौशल्य आत्मसात करून आपल्या गावातच एखादा व्यवसाय त्यांनी सुरू केला, तर अधिक समृद्ध आयुष्य जगता येऊ शकेल. जनशिक्षण संस्थान निव्वळ प्रशिक्षण देऊन थांबणार नाही तर उपजीविकेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीही प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.

संस्थेच्या संचालिका सीमा यादव यांनी संस्थेचे विविध कोर्सेस आणि त्यांच्या उपयोगितेविषयी विवेचन केले. या उपक्रमाला दापोली तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिली. भाजप उत्तर रत्नागिरी उपाध्यक्ष दीपक महाजन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी या संधीचा आपले भविष्य घडविण्यासाठी पुरेपूर वापर करावा. या कार्यक्रमाला मकरंद म्हादळेकर, काका महाजन प्रतिष्ठानचे मिहिर महाजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन लॉजिक कॉम्प्युटरच्या संस्थापिका रुहीक्षा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी निशा उपलप यांनी विशेष परिश्रम घेतले.

दापोली अभ्यासवर्ग  उद्घाटन प्रसंगी उद्बोधन करताना अध्यक्ष डॉ. विनय नातू, सोबत दीपक महाजन, जनशिक्षण संस्थान संचालिका सौ. सीमा यादव आणि इतर मान्यवर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply