रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे २७ नोव्हेंबरला विशेष पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी (दि. २७ नोव्हेंबर) दुपारी ३.३० वाजता संघाच्या शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर उपस्थित राहणार असून बदल कसा स्वीकारू या या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

व्याकरणरत्न पदवी संपादन केल्याबद्दल तन्मय हर्डीकर, संस्कृत न्यायशास्त्रातील महापरीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल अमोघ पेंढारकर आणि चैतन्य पाध्ये यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

सौ. रेणू दांडेकर प्रथितयश लेखिका असून त्यांनी चिखलगाव येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ३३ वर्षे मराठीचे अध्यापन केले. मराठी भाषेसंदर्भात विशेष काम केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळात परीक्षण समितीच्या सदस्य, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेबद्दलचे विशेष मार्गदर्शन त्या करत आहेत.

तन्मय हर्डीकर यांनी माणगाव येथे ऋग्वेदीय स्मार्त याज्ञिकाचे आंशिक अध्ययन केले. नंतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून संस्कृत विषयात पदवी मिळवली. श्रीविद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले. नंतर कांची कामकोटी पीठाधीश श्री विजेयेंद्र सरस्वती स्वामीजींच्या सान्निध्यात ते महापरीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते श्री विद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्यापन करतात. सौ. कल्याणी हर्डीकर यांनी महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांच्या पुणे येथील नृसिंहसरस्वती पाठशाळेत न्यायशास्त्राचे अध्ययन सुरू केले व काणकोण येथे वाग्वर्धिनी पाठाशाळेत अध्ययन पूर्ण केले. १६ ऑगस्ट २२ रोजी शृंगेरी येथे श्री विद्युशेखरभारती स्वामीजींच्या उपस्थितीत महापरीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या श्रीविद्या पाठशाळा गोवा येथे त्या न्यायशास्त्राचे अध्यापन करत आहेत. या दांपत्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या महिला वैज्ञानिक उपक्रमांतर्गत बौद्धिक मालमत्ता अधिकार या विषयात पेटंट एजंट ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सौ. शलाका टोळ्ये या २०१९ मध्ये नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट झाल्या. पुढे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी मार्च २०२२ मध्ये बौद्धिक संपदा क्षेत्रातच कार्यरत राहिलेल्या ७५ व्यावसायिक यशस्वी महिलांची दखल घेतली. त्यामध्ये सौ. टोळ्ये यांचा समावेश होता. याबद्दल त्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ सन्मानित करणार आहे.

अमोघ पेंढारकर देवरूखमध्ये औषध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. गोळवली, संगमेश्वर येथील चैतन्य पाध्ये याने बीकॉम पदवी संपादन केली असून वयाच्या एकविसाव्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्या दोघांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply