महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

मुंबई : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.

‘विकसित भारत संकल्प यात्रा राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,’ अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते मुंबईत या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते.

बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे २८ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी विभागातील माधवबाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली.

या वेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंडीगड, जम्मू-काश्मीर, बिहार आणि गुजरातमधील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधिक संवाद साधला.

विकसित भारत संकल्प यात्रेबाबत पंतप्रधान म्हणाले, ‘देशाच्या कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल, युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.’

‘प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावेत,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी हा प्रयत्न असणार आहे.’

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.’महाराष्ट्रातील विकासकामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकासकामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधित कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.

या वेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी आमदार अतुल शहा, नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर, सी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply