रत्नागिरी : ‘सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयाला शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशूरांनी मदत करावी,’ असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी रविवारी (१० डिसेंबर) रत्नागिरीत केले. छात्रालयाच्या १९व्या छात्र-मित्र मेळाव्यात ते बोलत होते. दत्तमंगल कार्यालयात हा मेळावा रंगला. या कार्यक्रमात पहिला सर्वोदय पुरस्कार शिवराम जाधव यांना गीते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
प्रास्ताविकामध्ये रघुवीर शेलार यांनी सांगितले, की ‘आजचा छात्र-मित्र मेळावा आयुष्याच्या शिदोरीत भर घालणारा आहे. सर्वोदय छात्रालयाचे आतापर्यंत एक हजार माजी विद्यार्थी आहेत. छात्रालयाला ७५ वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी संस्थेकरिता ५ टक्के योगदान द्यावे. २८ एप्रिलला मोठा कार्यक्रम होणार आहे.’
दयानंद परवडी यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा जयश्री बर्वे यांनी केले. शिवप्रकाश चौघुले यांनी आभार मानले.

विद्यार्थी गहिवरले
माजी विद्यार्थी तथा जलसंपदा विभागातील वरिष्ठ लिपिक जयदीप कांबळे यांनी सांगितले,’ मला छात्रालयात फक्त १०० रुपयांत प्रवेश मिळाला; पण १०० कोटींपेक्षा जास्त संस्कार येथे मिळाले. माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.’ त्यांच्याप्रमाणेच अन्य अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून छात्रालयाचे व हरिश्चंद्र गीते यांचे आभार मानले. अनेक माजी विद्यार्थी गहिवरून आपल्या आठवणी सांगत होते. ८४ वर्षीय बाबाजी गिडये यांनीही मनोगतात छात्रालयाचे अनंत उपकार असल्याचे सांगितले. मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुभाषित नवनीत प्रकाशित
हरिश्चंद्र गीते यांनी संपादित केलेल्या ‘सुभाषित नवनीत’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी बीना कळंबटे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृत साहित्यामध्ये सुभाषितांचे विशेष स्थान आहे. सुभाषितात चांगली व उपयुक्त मार्गदर्शक रचना केलेली असते. त्यामुळे त्यांचे संकलन केल्याचे श्री. गीते यांनी सांगितले.

पहिला सर्वोदय पुरस्कार शिवराम जाधव यांना प्रदान
‘सर्वोदय छात्रालय होते म्हणूनच शिस्त, काटकसर शिकलो व संस्कारित झालो. त्यामुळे रा. प. महामंडळात विविध पदांवर काम करताना त्या त्या ठिकाणी शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे काम करून महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांची बचत करू शकलो. छात्रालयात राहिलो म्हणूनच हे संस्कार होऊ शकले,’ असे प्रतिपादन शिवराम जाधव यांनी केले. पहिला सर्वोदय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
(कै.) सौ. हेमलता व हरिश्चंद्र गीते पुरस्कृत हा पुरस्कार जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, चषक आणि ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची सर्व रक्कम श्री. जाधव यांनी यमुनाबाई खेर ट्रस्टकडे सुपूर्द केली.
श्री. जाधव यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना जयश्री बर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील जाधव हे सामान्य कुटुंबात जन्मले. त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. परंतु राहण्याची व्यवस्था नसल्याने सर्वोदय छात्रालयात वास्तव्यास आले. छात्रालयात दररोज पाच वाजता उठून प्रार्थना म्हणून नंतर सर्व कामे करत. शिक्षणानंतर १९८०पासून ते रा. प. महामंडळात सहायक कार्यशाळा अधीक्षक म्हणून रुजू झाले. वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कार्यशाळा उपअभियंता, यंत्र अभियंता (चालन), प्रादेशिक अभियंता अशा विविध पदांवर त्यांनी नोकरी केली. एसटी आगार फायद्यात आणले. गाड्यांची दुरुस्ती, इंधन बचत याकरिता त्यांना बक्षिसे मिळाली. लाइन चेकिंग सक्षम करून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. यामध्ये शिवप्रकाश चौघुले, डॉ. श्रीपाद कोदारे, किशोर ठूल, प्रकाश तेरवणकर, प्रकाश जाबरे, दयानंद परवडी, अॅड. मिलिंद लोखंडे, रघुवीर शेलार, नरेंद्र खानविलकर, पंकज बाणे, कमलाकर हेदवकर आणि अशोक निर्मळ यांचा समावेश होता.

