या वर्षीचा म्हणजे बावन्नावा नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात राजकोट आणि तारकर्ली येथे साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख, तसेच मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात पंतप्रधानांनी कोकणाची भलामण केली. कोकण म्हणजे अभूतपूर्व संधींचा प्रदेश, अशा शब्दांत त्यांनी कोकणाविषयीचे मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेले आरमार, त्याची त्या काळातील आवश्यकता यांचा ऊहापोह पंतप्रधानांनी केला. भारताचा इतिहास म्हणजे केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून त्यामध्ये भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधनसामग्री नसतानाही उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला.
शिवरायांच्या या दक्षिण दिग्विजयाची माहिती कोकणवासीयांनाही आहेच. कोकणाचा शिवरायांच्या काळातील आणि स्वातंत्र्याच्या काळातील इतिहास वैभवशाली आहे. आजकाल कोकणाच्या पर्यटनाचा डंका पिटला जात आहे त्यासाठी नैसर्गिक स्थळे, धार्मिक स्थळे यांची चर्चा केली जात आहे. त्या ठिकाणी जाण्याकरिता रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी योग्य त्या व्यवस्था करण्याची चर्चा केली जाते. त्या दृष्टीने आवश्यक पावलेही पडत आहेत. ती धीम्या गतीने असली तरी आश्वासक नक्की आहेत; पण या पलीकडे जाऊन कोकणातील पर्यटनाच्या वाढीसाठी नौदल दिनाच्या निमित्ताने कोकणाच्या बलस्थानांना मिळालेला उजाळा लक्षात घेऊन त्या दृष्टीनेही पर्यटनाची आखणी करायला हवी नेहमीप्रमाणेच हे सारे कोकणात असूनही आपल्याला त्याचे महत्त्वच कळलेले नाही. त्याची दखल आता तरी घ्यावी. कस्तुरीमृगाप्रमाणे पर्यटनाची स्वतःची बलस्थाने दुर्लक्षित करून पर्यटनाचे अन्य पर्याय शोधत राहू नये. केवळ निसर्गसौंदर्य नव्हे, तर देशाच्या संरक्षणामध्येही कोकणाची भूमिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनेही ऐतिहासिक पर्यटनस्थळ अशीही कोकणाची ओळख निर्माण झाली पाहिजे.
स्वच्छ आणि भव्य समुद्रकिनारे आणि विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा, दापोली तालुक्यातील गोवा किल्ला असे मोजके किल्ले इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून पाहत असतात. पर्यटकांचेही वेगवेगळे प्रकार असतात. त्यापैकी इतिहासाचा मागोवा घेणारे पर्यटक वेगळेच असतात; पण त्याचबरोबर सर्वच पर्यटकांपर्यंत कोकणाच्या इतिहासाची महती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसा आराखडा तयार करायला हवा. शिवकालापासून स्वातंत्र्यापर्यत समुद्राला खूप महत्त्व होते. तुलनेने कमी खर्चाची प्रवासी वाहतूकही समुद्रमार्गे होत असे; पण विविध कारणांनी ती वाहतूक बंद पडली. मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर तर कोकणातील किनारे म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी उपयुक्त तळ समजला जाऊ लागला. एक प्रकारे कोकणाच्या सुंदर किनाऱ्यांची ही बदनामीच होती. पर्यटनाच्या दृष्टीने या किनाऱ्यांवर आणि तेथील ऐतिहासिक वास्तूंवर सातत्याने वावर सुरू झाला, तर दहशतवाद्यांच्या दृष्टीने ही ठिकाणे सुरक्षित राहणार नाहीत. एक प्रकारे अप्रत्यक्षपणे किनाऱ्यांच्या आणि देशाच्या संरक्षणालाच मदत होणार आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे जो काही आढावा घेतला गेला, त्यातूनच कोकणातील सागरी किनाऱ्यांच्या नव्या पर्यटन क्षेत्रांची निश्चिती करायला हवी, तसा आराखडा तयार करायला हवा. त्यातून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच कोट्यवधी रुपये खर्च करून साजरा झालेला नौदल दिन कोकणाच्या दृष्टीने सार्थकी लागेल. अन्यथा हजारो लोकांच्या उपस्थितीत कडेकोट बंदोबस्तात साजरा झालेला राष्ट्रीय कार्यक्रम एवढेच त्याचे महत्त्व राहील.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ डिसेंबर २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

