विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

रत्नागिरी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातील लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आले. विविध योजनांसाठी पात्र असलेल्या, परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यात आली. विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीही या वेळी करून घेण्यात आली. २०२४च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. (व्हिडिओ शेवटी)

‘२०४७मध्ये भारत हे विकसित राष्ट्र असेल आणि आज १८ ते ४० वयोगटात असलेले तरुण त्याचे आधारस्तंभ आहेत,’ असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी या वेळी केलं. विविध सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी या यात्रेला उपस्थित होते. त्यात भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप शहाराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, मानसी करमरकर, दादा ढेकणे, सौ. ढेकणे, विक्रम जैन आदींचा समावेश होता.

या वेळी लाभार्थी श्रद्धा शिंदे यांनी सांगितले, ‘मी शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करते. पीएम स्वनिधी योजनेतून मला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळाले आणि मी भाजीविक्री सुरू केली. पहिले कर्ज फेडले आणि आता पुन्हा २० हजारांचे कर्ज घेतले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मला मिळाला.’

लाभार्थी संदीप जाधव म्हणाले, ‘मी रत्नागिरी हेड पोस्ट ऑफिसजवळ नारळपाणी केंद्र चालवतो. मी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून १० हजारांचे कर्ज घेतले. ते वर्षभरात फेडले व मला पुन्हा २० हजारांचे कर्ज मिळले. मी या योजनेमुळे आत्मनिर्भर झालो आहे. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे.’

आज संध्याकाळी यात्रा मारुती मंदिर परिसरातही आली होती.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply