Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

निवे आश्रमशाळेत बुधवारी खासदार नारायण राणे यांचा ‘युवा संवाद’

निवे आश्रमशाळेत बुधवारी खासदार नारायण राणे यांचा ‘युवा संवाद’
Advertisements

रत्नागिरी : निवे (ता. संगमेश्वर) येथील आश्रमशाळेत बुधवारी, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी ‘युवा संवाद’ कार्यक्रमात खासदार नारायण राणे तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत.

राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत युवा शक्तीला केंद्रस्थानी आणून सशक्त व समृद्ध भारताची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लोकसभेचे खासदार नारायण राणे यांना आमंत्रित करण्यात आले असून, तरुणांचे प्रेरणास्थान असलेले ‘युथ आयकॉन’ कमलेश सोनावणे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक नेतृत्वाचा समृद्ध अनुभव आणि तरुणांच्या नव्या आकांक्षा यांचा मिलाफ या व्यासपीठावर अनुभवता येणार आहे.

‘विकसित भारत@२०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील ५०० हून अधिक विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘विकसित भारत युवा संवाद’ मोहीम राबवली जात आहे. याच देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यात हा कार्यक्रम होत आहे.

केवळ औपचारिकता न राहता, तरुणांना आपल्या लोकप्रतिनिधींसोबत थेट विचारविनिमय करता यावा हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. या संवादात्मक चर्चेत सहभागी तरुणांना लोकशाहीतील सहभाग, नागरी हक्क, सामाजिक जबाबदाऱ्या आणि देशाच्या विकासातील त्यांचे योगदान यावर थेट प्रश्न विचारण्याची आणि आपले नाविन्यपूर्ण विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय, कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वजण ‘लोकतांत्रिक प्रतिज्ञा’ घेणार असून, याद्वारे संविधानातील लोकशाही मूल्यांविषयी आणि जबाबदार नागरिकत्वाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त करतील.

देशाच्या प्रगतीची केवळ जाणीव ठेवणारी नव्हे, तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणारी एक सजग व सक्षम पिढी घडवण्याचा संकल्प या ‘युवा संवाद’च्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version