केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी गोळवली (ता. संगमेश्वर) येथील गोळवलकर गुरुजी प्रकल्पात ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक, पुणे आणि महाड (जि. रायगड) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्री. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कालपासून कोकणात सुरू झाली आहे. त्यादरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे काल त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात द्वेषभाव, बदनामीकारक विधाने केल्याबाबतचा गुन्हा शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे दाखल केला होता. त्यानुसार आयुक्त दीपक पांडे यांनी श्री. राणे यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. द्वेषभावनेचा प्रसार पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्री. राणे यांनी रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. रत्नागिरीच्या कार्यकक्षेत श्री. राणे यांच्याविरुद्ध कोणताच गुन्हा दाखल झालेला नसल्याने अर्ज फेटाळण्यात आल्याचे समजते. त्यानंतर श्री. राणे यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तेथील न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच योग्य त्या बाबींची पूर्तता करून अर्ज दाखल करण्यास सांगितले.

दरम्यानच्या काळात श्री. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमधून रत्नागिरीच्या दिशेने निघाली. ते गोळवली (ता. संगमेश्वर) येथे गोळवलकर गुरुजी स्मारकात आले असता पोलिसांनी त्यांना तेथेच रोखून धरले. नाशिक पोलिसांच्या संदेशानुसार रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि महाडच्या पोलिसांनी श्री. राणे यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, काल महाड येथे श्री. राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्गचेच खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदावरून तात्काळ हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन पाठविले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणे अतिशय निंदनीय आहे. श्री. राणे यांनी मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांचा अपमान होत असल्याने त्यांना पदावरून त्वरित दूर करण्यात यावे, अशी मागणी श्री. राऊत यांनी केली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply