रत्नागिरी : ‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांना विजयाचं प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते.
‘रत्नागिरी-सिंधुदुर्गात मोठे प्रकल्प यावेत, छोटे उद्योगही यावेत आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, हाही माझा प्रयत्न असेल,’ असं राणे यांनी सांगितलं. रिफायनरी मार्गी लागणार का असं विचारलं असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं.
‘मी ही निवडणूक जिंकलो, त्याचा मला आनंद आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतले भाजपचे जिल्हाध्यक्ष, सगळे पदाधिकारी यांनी फार मेहनत घेतली आणि त्यांनी हा विजय खेचून आणला आहे. त्यांचा मी आभारी आहे. निलेश आणि नितेश यांनीही चांगलं काम केलं. सर्वांनी दिवस-रात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला,’ असं राणे यांनी सांगितलं. ‘सिंधुदुर्गचे लोक प्रेम करतात, आशीर्वाद देतात, योगदानही देतात, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. त्यांच्या उपकाराची आणि प्रेमाची परतफेड मी या आयुष्यात करू शकणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
‘ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना, खासकरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा विचार करता, आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. त्यांच्या नेतेमंडळींची भाषा, पंतप्रधानांसह अन्य नेत्यांवर केलेली टीका हे सगळं पाहता आमच्या विरोधकांनी वैचारिक पातळी गमावलेली आहे, असं मला वाटलं. विरोधकांकडून नुसती दिशाभूल करण्यात आली. गेली १० वर्षं जे खासदार होते, त्यांचं रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी काय योगदान आहे? नागरी सुविधांसाठी आपण काय केलं हे सांगून मतं मागायला हवी होती; मात्र त्यांनी फक्त टीका करून मतं मागितली. त्यांना मतदारांनी योग्य धडा शिकवला आहे. शिव्या देण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काही येतच नाही. म्हणून त्यांची फजिती झाली. त्यांनी आता तोंड बंद करावं. वातावरण कलुषित करू नये,’ असं राणे म्हणाले.
लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना राणे म्हणाले, ‘अब की बार, विरोधकांना धडा शिकवीन. तसंच, काही आप्त, काही सहकारी, काही युतीतल्या पक्षांचं वागणं ‘नांदा सौख्यभरे’ला शोभणारं नव्हतं. भाजपच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला. ज्यांनी दगाफटका केला, त्यांना त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल.’ कोणावर रोष आहे, असं विचारलं असता, ‘संधी येईल तेव्हा दोष दाखवून द्यायचा असतो,’ असं ते म्हणाले. देशात तिसऱ्यांदा सत्ता आली म्हणून त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं.
मंत्री म्हणून शपथ घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, की ‘मी मंत्रिपदाचं स्वप्न पाहून निवडणूक लढवलेली नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. मंत्रिपदाचा निर्णय पक्षाचा असेल.’ महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी घेतल्याबद्दल विचारलं असता, त्याबद्दल आम्ही आत्मपरीक्षण करू असं राणे म्हणाले.
https://www.facebook.com/share/v/pT1pjbmjq5xE27Z1/?mibextid=oFDknk
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

