Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

निवृत्त शिक्षिका मीनाक्षी तुपे यांचे देहदान; मृत्यूनंतरही जपला ज्ञानदानाचा वसा

निवृत्त शिक्षिका मीनाक्षी तुपे यांचे देहदान; मृत्यूनंतरही जपला ज्ञानदानाचा वसा
Advertisements

रत्नागिरी : आयुष्यभर शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या एका शिक्षिकेने मृत्यूनंतरही आपली शैक्षणिक बांधिलकी जपत समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. उत्कर्षनगरमधील हनुमान सोसायटीतील रहिवासी असलेल्या निवृत्त प्राथमिक शिक्षिका मीनाक्षी पद्माकर तुपे (७८ वर्षे) यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करून दातृत्वाचा अनमोल संदेश दिला. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे २६वे देहदान ठरले. ते अत्यंत आदरपूर्ण वातावरणात पार पडले.

मीनाक्षी तुपे यांचे २८ ऑक्टोबर रोजी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 'मृत्यूनंतर आपल्या शरीराचा उपयोग भावी डॉक्टरांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी व्हावा,' या उदात्त हेतूने हयात असतानाच त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या या इच्छेचा आदर केला. त्यांनी केवळ देहदानच नव्हे, तर नेत्रदान करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला. यामुळे अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट येणार असून, वैद्यकीय शिक्षणासाठी देह उपलब्ध झाला आहे. मीनाक्षी यांच्या पश्चात मुलगा पंकज तुपे, सून वृषाली, मुलगी प्रणिता मुकादम, जावई संजय मुकादम, नातवंडे व सुना असा परिवार आहे. या सर्वांनी दाखवलेले सामाजिक भान समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे. हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या प्रक्रियेत शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांच्यासह पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिहिर लोंढे, श्रेयस जोशी, राज पेडणेकर आणि वाहनचालक सौरभ जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यात समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तुपे कुटुंबीयांच्या या अनुकरणीय आणि प्रेरणादायी कृत्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version