
रत्नागिरी : देवाचं नामस्मरण आणि पूजा करणं ही भक्ती तर देवाला आवडतेच; मात्र जनसेवा हीच खरी ईशसेवा असल्याचं आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे. याचं एक आदर्श उदाहरण रत्नागिरीतील वासुदेव सप्रे यांनी घालून दिलं आहे. मुरलीधर मंदिराचे पुजारी या नात्याने सुमारे ६० वर्षं ईशसेवा केलेल्या वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी मृत्यूनंतरही आपला सेवेचा वसा कायम राखला आहे. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री वयाच्या ८७व्या वर्षी सप्रे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प केला होता. तो संकल्प त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी पूर्ण केला आहे. आज, १७ एप्रिल रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली.
वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध मुरलीधर मंदिराचे पुजारी म्हणून सुमारे ६० वर्षं कार्य केलं. रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशाला आणि गोदूताई जांभेकर विद्यालयात लिपिक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. १६ एप्रिल रोजी रात्री सप्रे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. सप्रे यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचे पुत्र हेमंत वासुदेव सप्रे आणि कन्या सौ. संपदा सुनील जायदे यांनी आज (१७ एप्रिल) रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आपल्या वडिलांची नेत्रदान प्रकिया पूर्ण केली. त्यानंतर रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचं देहदान करण्यात आलं. त्याचा उपयोग या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी होणार आहे. हे महाविद्यालय सुरू झाल्यापासून या महाविद्यालयात झालेलं हे पाचवं देहदान आहे. यासाठी समाजसेवक समीर करमरकर आणि विनायक शितूत यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजूषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, शिपाई मिहीर लोंढे, तसंच रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिलं.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

